‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं आहे. टीझर व ट्रेलरप्रमाणेच या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.
‘महाराष्ट्र शाहीर’च्या प्रमोशनकरिता चित्रपटाच्या टीमने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. लोकप्रिय टीव्ही शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्येही महाराष्ट्र शाहीरची टीम आली होती. यावेळी हास्यजत्रेतील विनोदवीरांनी स्पेशल स्किट सादर केलं. समीर चौघुले, चेतना भट व ओंकार राऊत यांच्या या स्किटने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं.
चेतनाने या स्किटमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील लोकप्रिय ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गायलं. तर समीर चौघुलेंनी या गाण्यावर ऑन स्टेजच ठेका धरला. चौघुलेंनी ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेप्स करत स्किटमध्ये रंगत आणली. समीर चौघुलेंचा डान्स पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं. हास्यजत्रेतील हा व्हिडीओ अमित फाळके यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा>> “मी खूप प्रयत्न केले, पण…” इन्स्टा पोस्ट शेअर करत फॅशन डिझायनरने संपवलं जीवन, बेडरुममध्ये घेतला गळफास
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. याबरोबर अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.