‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतो. कलाकारांचे अफलातून विनोद व सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांचे ते भरभरून मनोरंजन करताना दिसतात. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. याबरोबरच, या शोमधील कलाकार विविध कारणांमुळे चर्चेत असलेले दिसतात. आता अभिनेत्री नम्रता संभेराव(Namrata Sambherao)ने तिच्या सहकलाकाराचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कोणत्या सहकलाकाराचे केले कौतुक
अभिनेत्री नम्रता संभेराव व तिचा सहकलाकार प्रसाद खांडेकर यांनी नुकताच अल्ट्रा मराठी बझबरोबर संवाद साधला. यावेळी नम्रताने प्रसादचे कौतुक करताना म्हटले, “मला प्रसादचा अभिमान वाटतो. कारण लेखन, दिग्दर्शन, अभिनेता आणि आता निर्माता या सगळ्या गोष्टी तो इतक्या सुंदर पार पाडतो. मी त्या भूमिकेत अजून नाहीये, मी अजून अभिनेत्रीच्याच भूमिकेत आहे. पण, जेव्हा एक तिसरी व्यक्ती म्हणून बघते त्यावेळी त्याचा जास्त अभिमान वाटतो. मी त्याला नेहमी म्हणते की मला हे कधीच जमणार नाही. आधीच एक संसार आणि हे क्षेत्र आहे, तीच एक तारेवरची कसरत आहे. पण, प्रसाद या अभिनयसृष्टीला त्याचा संसार असल्यासारखंच बघतो. मला त्याबाबतीत त्याचा खूपच अभिमान वाटतो. तो त्याच्या कामाबाबतीत इतका सतर्क असतो, मग ते नेपथ्य असो, म्युझिक असो किंवा ते लाइटचं काम असो, तो सगळ्याच बाबतीत सतर्क असतो”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या सहकलाकाराचे कौतुक केले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. कलाकारांबरोबरच या शोचे सूत्रसंचालन करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कमेंटसने लक्ष वेधून घेताना दिसते, तर अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षकपदी असल्याचे पाहायला मिळते.
नम्रता या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. तिला या माध्यमातून एक वेगळी ओळख, तिचा चाहतावर्ग निर्माण झालेला दिसतो. काही दिवसांपूर्वीच तिने एका चाहतीचा सांगितलेला किस्सा चर्चेत होता. अमेरिकेच्या दौऱ्यात एका चाहतीने तिच्या हातातील कडं नम्रताला भेट म्हणून दिल्याचे तिने सांगितले होते.