‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते. नम्रताने आपल्या विनोदी शैलीने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे नम्रताला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे आज नम्रता नाटक, चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे.
काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली. त्यामुळे आता हास्यजत्रेतील अवलीय कलाकार पुन्हा एकदा खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. अशातच नम्रता संभेरावने नवऱ्याचा एक किस्सा सांगितला; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
अलीकडेच नम्रता संभेरावने ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने सासू आणि नवऱ्याचं भरभरून कौतुक केलं. अभिनय क्षेत्रात काम करताना सासू आणि नवरा कशाप्रकारे मदत करतात याबद्दल सांगितलं. यावेळी तिने एक किस्सा सांगितला. तिला विचारलं की, नवऱ्याबद्दल काय सांगशील? तर नम्रता म्हणाली, “योगेशबद्दल बोलायचं झालं तर, तो माझा नवरा तर आहेच. पण खूप चांगला मित्र आहे. खूप पाठिंबा देतो. त्याच्याबद्दल एक किस्सा सांगायचा झाला तर रुद्राज दोन महिन्यांचाच होता. त्यावेळी मला एका चित्रपटाची ऑफर आली. मला कळेना काय करायचं. कारण रुद्राज फक्त दोन महिन्यांचा होता.”
“योगेश म्हणाला, नाही. तुझ्या वाट्याला चित्रपट येतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्या बायोडेटामध्ये तुझ्या नावावर एक फिल्म अॅड होणार आहे. त्यामुळे तू करत नाहीस, असं सांगू नकोस. आपण सगळे जाऊ. जिथे शूटिंग असेल तिथे माझा नवरा, मुलगा, सासू शूटिंगच्या ठिकाणी गेलो. तिथल्याच एका हॉटेलमध्ये राहिलो आणि मग तिथेच शूटिंग करत रुद्राजला बघत होते. हाच पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. याने एक उर्जा मिळते. त्यामुळे मी नेहमीच सांगत असते. तो माझा उत्तम मित्र आहे,” असं नम्रता संभेराव म्हणाली.
दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिच नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात नम्रता संभेरावर पाहायला मिळणार आहे. या नाटकात नम्रतासह प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर दिसणार आहे. २१ डिसेंबरपासून ‘थेट तुमच्या घरातून’ नाटक रंगभूमीवर येणार आहे.