‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे नम्रताला एक वेगळी ओळख मिळाली. त्यामुळे तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. महाराष्ट्रातच नाही तर जगभरात नम्रताचे चाहते आहेत. सध्या अभिनेत्रीच्या अमेरिकेतील चाहतीचा किस्सा चर्चेत आला आहे.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, लंडन हे परदेशातील दौरे झाल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. २ डिसेंबरपासून हास्यजत्राचं नवं पर्व सुरू झालं. यानिमित्ताने कार्यक्रमातील कलाकारांनी विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी नम्रता संभेरावने अमेरिकेतील एका चाहतीचा किस्सा सांगितला.
हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधीने ‘या’ अभिनेत्यासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “३३ वेळा लिहून, खोडून…”
‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना नम्रता संभेराव म्हणाली, “मला लोकांचं इतकं प्रेम मिळेल, असं वाटलं नव्हतं. अशा पद्धतीने लोक आपल्यावर प्रेम करतात, वेडे होतात, हे माहीत नव्हतं. फोटो काढण्यासाठी वेडे होतात, उड्या मारतात. डोळ्यात पाणी असतं. मिठ्या मारतात. बायकांना तर पप्या घ्यायच्या असतात, गाल ओढायचे असतात.”
पुढे नम्रता संभेराव म्हणाली की, एका बाईने तर तिच्या हातामध्ये जड चांदीचं कडं होतं, ती आली तिने माझ्या हातात कडं घातलं आणि म्हटली, एक फोटो. मी म्हटलं, तुम्ही हे काय करता? हे मला नकोय. नाही, नाही ही माझी आठवण म्हणून ठेवा. अमेरिकेत गेलो होतो तेव्हा ही गोष्ट घडली होती. पण, मी म्हटलं, नाही. तर त्या म्हणाल्या, नाही. माझी आठवण म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं. कारण माझ्याकडे तुम्हाला देण्यासारख काही नाही. म्हणून तिने तिच्या हातातलं चांदीचं कडं माझ्या हातात घातलं. हे प्रेम आहे. माझ्या बाबतीत हे बऱ्याचदा झालं. हे काहीतरी वेगळं आहे.”
दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचं नवंकोरं नाटक रंगभूमीवर येत आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ असं नाटकाचं नाव आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित या नाटकात नम्रतासह शिवाली परब, ओंकार परब, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर पाहायला मिळणार आहेत. २१ डिसेंबरला ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाचा शुभारंभ असणार आहे.