‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातील दोघे म्हणजे ओंकार भोजने आणि गौरव मोरे. ओंकार आणि गौरवच्या स्किटने सगळ्यांना खळखळून हसवले. ओंकार आणि गौरव दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकतंच एका मुलाखतीत ओंकारने गौरवबद्दल भाष्य केलं आहे.
हेही वाचा- ‘सफरचंद’ नाटक पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली “पडदा उघडताच…”
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ओंकारने गौरवबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. ओंकार म्हणाला. “गौरव मला सिनिअर आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा गट आहे. त्यातलीच एक महत्वाची एकांकिका म्हणजे सवाई एकांकिका. सवाईच्या रात्री मी ज्या दोन एकांकिका पहायला गेलो होतो त्या माझ्या पाहून झाल्या होत्या. बऱ्यापैकी मी प्रवास करुन आलो होतो त्यामुळे त्या बघून झाल्यानंतर मी पेंगलो. मध्यरात्री एका एकांकिका बघताना प्रेक्षक खूप लोळून हसत होते. त्या आवाजाने मी उठलो आणि समोर काय सुरु आहे हे पाहू लागलो. समोर पडद्याआड एकांकिका सुरु होती. आणि ही एकांकिका गौरव मोरे करत होता. त्यापुढचे तीस चाळीस मिनिट मी आवाक होऊन ती एकांकिका पाहत होतो.”
ओंकार पुढे म्हणाला “त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच नाट्यगृहाच्या बाहेर मी गौरवला भेटला आणि त्याला म्हणालो गेल्यावर्षी मी तुझी ही एकांकिका पाहिली होती. मला तेव्हापासून तुला भेटायचं होतं. पण मला भेटता आलं नाही. त्याला जेव्हा कळालं मीसुध्दा एकांकिका करतो तेव्हा त्याने एकत्र काम करुया भेटूया असं म्हणत शाबासकी दिली. त्यानंतर जेव्हा हास्यजत्रेच्या सेटवर आम्ही एकत्र स्किट करणार होतो. तेव्हा मी विंगेत बोललो तो एक दिवस होता जेव्हा मी तुझ्यासाठी आलो होतो आणि आज मी तुझ्याबरोबर आहे. पहिल्या भेटीपासून आमच्या विणलं गेलेलं नात नंतर कामी येऊ लागलं.”