शिवसेनेचा ५७वा वर्धापन दिन सोमवारी(१९ जून) षण्णमुखानंद सभागृहात जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील कलाकारांनीही या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता प्रसाद खांडेकरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
प्रसादने या कार्यक्रमात शिवसेनेच्या वर्धापन दिनाची आठवण सांगितली. तो म्हणाला, “माझं शिवसेनेशी खूप जुनं नातं आहे. माझे बाबा १९९९ पर्यंत बोरीवलीमध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. १९९९ साली माझ्या वडिलांचं निधन झालं. मी लहान होतो तेव्हापासूनच बाबांबरोबर शिवसेनेच्या दसरा मेळावा, वर्धापन दिनाला हजेरी लावायचो.”
“आज इतक्या वर्षांनी शिवसेनेच्या याच वर्धापनदिनात मी सादरीकरण केलं. त्यामुळे मला थोडं भरुन आलं आहे,” असं म्हणत प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तच्या सोहळ्यात प्रसाद भावुक झालेला पाहायला मिळाला.
विनोदाची उत्तम जाण असणारा प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो. अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे.