विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं ४ जुलैला मुंबईत ढोल-ताशांचा गजरात जंगी स्वागत झालं. या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींची मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनारी एकच गर्दी पाहायला मिळाली. नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यादरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरला अविस्मरणीय असा भारतीय क्रिकेट संघाचा अनुभव आला. यासंबंधित त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अभिनेता प्रसाद खांडेकरने एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय क्रिकेट संघ वानखेडे स्टेडियमकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. पण याच वेळी बसमध्ये बसलेला हार्दिक पंड्याने प्रसादकडे बघून वर्ल्डकप उंचावला. हे बघून अभिनेत्याचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी प्रसादबरोबर त्याची पत्नी देखील पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने हा अविस्मरणीय अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा – “खरंतर हे मागच्या वर्षीच अपेक्षित होतं…”, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

प्रसादने लिहिलं आहे, “…आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्डकप उंचावला. आज दक्षिण मुंबईला कामानिमित्त जायचंच होतं. विचार केला की, नरीमन पॉइंटला जाऊन चॅम्पियन्सच्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया…पण बातम्यांमधली गर्दीचे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला. गप्पपणे बोरिवलीला निघालो…”

पुढे अभिनेत्याने लिहिलं, “साधारण सांताक्रूझच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथूनचं जाणार आहेत. नंतर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यात मध्येच आडव्या टाकून सगळेच भारतीय संघाची वाट बघत होते…क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाडीतून समोर आले…अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला…कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथीने हार्दिक पंड्यापर्यंत पोहोचला असावा. त्याने सुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडे बघून वर्ल्डकपचा कप उंचावला…”

“आयपीएल दरम्यान ज्या मुंबईने हार्दिकला ट्रोल केलं, आज त्याचं मुंबईकरांचं स्वागत खुल्या दिलाने स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हरच्या बाजूला बसलेला…त्याच्या पाठोपाठ अर्ध्या सेकंदासाठी दर्शन झालं ते द वॉल राहुल द्रविड…गरजेच्या क्षणी उभा राहणार बुम बुम बुमराह…दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत…आणि सगळेच ….आमचा बोरीवलीकर रोहित…विराट सूर्या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता…भेटतील ते ही असे अचानक…गर्दी जमणं आणि जमवणं यातील फरक पाहिला…स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे…टीम इंडिया चॅम्पियन्स तुम्हाला प्रचंड प्रेम आणि अभिमान मित्रांनो भावांनो,” असं प्रसाद खांडेकरने लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: ‘झलक दिखला जा ११’ची विजेती मनीषा रानीने वडिलांचं दुसरं स्वप्न केलं पूर्ण, हक्काचं घर बांधल्यानंतर दिली लाखो रुपयांची भेटवस्तू

दरम्यान, प्रसाद खांडेकरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्याचे चाहते या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. “दादा एक नंबर”, “व्वा किती छान”, “तू गाडी हायवेला सोडून व्हिडिओ काढला आहेस…यालाच म्हणतात क्रिकेट वेडे”, अशा अनेक प्रतिक्रिया प्रसादच्या पोस्टवर उमटल्या आहेत.