प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपल्याकडे स्वतःचं हक्काचं घर असावं. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण अविरत मेहनत करत असतात. काही दिवसांपूर्वी हक्काच्या घराचं स्वप्न ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री शिवाली परबचं पूर्ण झालं. तिने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या घरात गृहप्रवेश केला. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील अभिनेत्याचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील या अभिनेत्याने गेल्या महिन्यात आलिशान गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. लाल रंगाची महिंद्रा थार खरेदी केली होती. त्यानंतर आता या अभिनेत्याने गावाकडे हक्काचं घर बांधलं आहे. आतापर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील हा अभिनेता कोण असेल हे लक्षात आलंच असेल. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश शिवलकर आहे. प्रथमेशने आपल्या स्वप्नातली वास्तू बांधली आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रथमेशच्या हक्काचं सुंदर शेतकर पाहायला मिळत आहे. ‘शिवार्पण’ असं त्याच्या स्वप्नातल्या वास्तुचं नावं आहे. फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे, “याचसाठी केला होता अट्टाहास भाग २: ‘शिवार्पण’…शहरापासून दूर हक्काची एक वास्तू असावी; जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी…मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण; अशीच स्वप्नातली वास्तू झाली साकार, नाव तिचं ‘शिवार्पण’…ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो, त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते…तेव्हा त्या वास्तुचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजे ‘शिवार्पण’…हक्काचं शेतघर…याचसाठी केला होता अट्टाहास सीरिज टू बी कंटिन्यू.”
प्रथमेश शिवलकरचं हक्काचं शेतकर पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, अक्षया नाईक, कुंजिका काळविंट अशा अनेक कलाकारांनी प्रथमेशला शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन दादा”, “भावा मेहनतीचं फळ”, “अभिनंदन मराठी मुलं अशीच मोठी व्हावीत”, “खूप मस्त आहे घर”, अशा अनेक प्रतिक्रिया प्रथमेशच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.