Prithvik Pratap Wedding: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) लग्नगाठ बांधली. पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी अत्यंत साधेपणाने लग्न केलं. पृथ्वीकने लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आता पृथ्वीकसाठी त्याच्या मोठ्या भावाने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
पृथ्वीकला मोठा भाऊ आहे, त्याचे नाव प्रतीक कांबळे आहे. पृथ्वीक व प्राजक्ताच्या लग्नानंतर प्रतीकने त्यांचा लग्नातील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत एक कॅप्शन लिहिलं. पृथ्वीकने भावाची हीच स्टोरी रिपोस्ट केली आहे.
प्रिय पृथ्वीक, “आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आज तू अगदी शांततेत आणि साधेपणाने पार पाडलास.. तुझा आणि प्राजक्ताचा पुढचा प्रवास असाच शांततेत आणि साधेपणाने पार पडावा हीच मंगलकामना. आज आपलं कुटुंब पूर्ण झालं. आम्हाला दिलेल्या या सुखद क्षणांसाठी थँक्यू. मुलाचं लग्न आज पार पडलं. लव्ह यू”, असं प्रतीकने लिहिलं.
हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?
पृथ्वीकने ही स्टोरी रिपोस्ट केली असून ‘तुमच्यासाठी कायपण’ असं कॅप्शन त्याने दिलं.
पृथ्वीक प्रतापने लग्नाची बातमी दिल्यावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. अमृता खानविलकर, सायली संजीव, अभिजीत खांडकेकर, प्रसाद खांडेकर यांच्यासह अनेकांनी प्राजक्ता व पृथ्वीकचं अभिनंदन केलं आहे.
पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं?
पृथ्विक प्रतापने प्राजक्ताशी साधेपणाने लग्न का केलं, त्याचं कारणही सांगितलं. त्यांच्या लग्नाला अगदी मोजकेच मित्र आणि घरातील सदस्य उपस्थित होते. “मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांबरोबर साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जवाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे अस आम्हाला वाटतं”, असं पृथ्वीक म्हणाला.