काही दिवसांपासून ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं खूप ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. अनेकांना या गाण्यांची भुरळ पडली असून त्याच्यावर डान्स व्हिडीओ करताना दिसत आहेत. अशातच आता बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या नव्या गाण्याने सगळ्यांना वेड लावलं आहे. विकीच्या ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटातील ‘तौबा-तौबा’ गाणं २ जुलैला प्रदर्शित झालं. पण अवघ्या काही दिवसांमध्ये हे गाणं सुपरहिट झालं असून लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील लोक यावर जबरदस्त डान्स करत आहेत. ‘तौबा-तौबा’ गाण्यातील विकीच्या हूकस्टेपची सगळ्यांना भुरळ पडली आहे. त्यामुळेच अनेकजण विकीसारखा डान्स करताना दिसत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप देखील विकी कौशलसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण पृथ्वीकच्या आईनं असं काही केलं, की त्याच्या आईचं आता इतर कलाकार मंडळींसह नेटकरी कौतुक करत आहेत. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकताच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तो ‘तौबा-तौबा’ गाण्यावर विकी कौशलसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. “मी कधीही विकी कौशलला हरवू शकतो, पण…”, असं कॅप्शन लिहित पृथ्वीकने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत, पृथ्वीक ‘तौबा-तौबा’ गाण्यात विकी कौशलने केलेल्या हूकस्टेप करत असतो. पण तितक्यात अभिनेत्याची आई त्याच्या पायाखाली पायपुसणी फेकून देते. हे पाहून पृथ्वीक चिडतो आणि आई देखील त्याच्याकडे रागाने बघताना दिसत आहे. अभिनेत्याने केलेला हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पण इतर कलाकार मंडळींसह नेटकरी पृथ्वीकच्या आईचं कौतुक करत आहेत.
अभिनेता प्रथमेश परब, शिवाली परब, मेघा घाडगे यांच्यासह अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीकच्या आईचं कौतुक केलं आहे. “मम्मी रॉक्स”, “भारी आई”, “एका क्षणात विकी कौशलचा विक्रोळी कौशल केला आईनं”, “काकू भारी”, “आईचे एक्सप्रेशन्स तौबा-तौबा”, “आईसमोर सगळे हरतात”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Comments-On-Prithvik-Pratap-Video.jpg?w=830)
दरम्यान, पृथ्वीकच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर अभिनेत्याची दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वर्णी लागली आहे. दिया मिर्झाची ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म भेटीस येत आहे. या शॉर्ट फिल्मची दिया निर्माती असून यामध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहेत. पृथ्वीक प्रतापसह अभिनेत्री सायली संजीव, सुहास शिरसाट पाहायला मिळणार आहेत.