‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मराठी सिनेसृष्टीला अनेक नवोदित कलाकार भेटले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. यामधील एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाने घरोघरी पोहोचलेल्या पृथ्वीक प्रतापने अचानक चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. आजच पृथ्वीक प्रतापने लग्नगाठ बांधली आहे.
हेही वाचा – “या भाईला टेन्शनच नाही…”, जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणच्या कुटुंबाला सांगितले त्याचे किस्से; पाहा व्हिडीओ
लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत पृथ्वीकने लिहिलं आहे, “२५-१०-२०२४…एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.” असं सुंदर कॅप्शन पृथ्वीकने लिहिलं आहे. अत्यंत साध्या पद्धतीत, अजिबात गाजावाजा न करताना पृथ्वीकने लग्न केलं आहे. प्राजक्ता असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.
लग्नासाठी पृथ्वीक आणि प्राजक्ताने खास लूक केला होता. प्राजक्ताने क्रिम कलरची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर तिने मोजकी ज्वेलरी आणि केसात गजरा माळला होता. तर पृथ्वीक पांढऱ्या रंगाच्या धोती सेटमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांच्या गळ्यात मोगऱ्याचा हार असून दोघं खूप आनंदी असल्याचं दिसत आहे.
पृथ्वीकच्या लग्नाचे फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अभिनेत्री श्रुती मराठे, अश्विनी महांगडे, प्रथमेश शिवलकर, अमृता खानविलकर, अक्षया नाईक, स्वानंदी टीकेकर, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, प्रथमेश परब, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.