‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. लग्न झाल्यापासून पृथ्वीक बऱ्याचदा बायकोबरोबर मजेशीर व्हिडीओ करत असतो; त्याचे हे व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रतापने गेल्यावर्षी २५ ऑक्टोबरला लग्न केलं. प्राजक्ता वायकूळ हिच्याशी लग्नागाठ बांधून पृथ्वीकने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. पृथ्वीक आणि प्राजक्ताचं नोंदणी पद्धतीने लग्न झालं. आता दोघांच्या लग्नाला अडीच महिने पूर्ण झाले आहेत. नुकतीच दोघांनी लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली. यानिमित्ताने पृथ्वीकने बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
“नव्या वर्षातील पहिला सण…संक्रांत”, असं कॅप्शन देत पृथ्वीकने मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वीकची बायको प्राजक्ता अभिनेता तिळगुळ देत म्हणते, “तिळगुळ घे गोड गोडंच बोल.” त्यानंतर पृथ्वीक बायकोला तिळगुळ देत म्हणतो, “तिळगुळ घे आणि थोडं थोडंच बोल…” हे ऐकल्यानंतर प्राजक्ताने पृथ्वीकला थेट घराबाहेर रस्ता दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकूळच्या या मजेशीर व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रतिक्रिया देत म्हणाली, “असंच पाहिजे.” तसंच अभिनेत्री शिवाली परब, नम्रता प्रधान, ऋतुजा बागवे, राजसी भावे, प्राप्ती रेडकर यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा – शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
दरम्यान, पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकूळने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. साधेपणाने लग्न करण्यामागे दोघांचा एक हेतू होता; जो लग्नानंतर समोर आला होता. पृथ्वीक म्हणाला होता की, मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे, असं आम्हाला वाटतं.