‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि त्यातील कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय कार्यक्रमाने मराठी सिनेसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले आहेत. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामधील एक म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज घराघरात पोहोचला आहे. आता पृथ्वीक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही नशीब आजमावत आहे. अशा या लोकप्रिय पृथ्वीकने आपल्या आईला वाढदिवसानिमित्ताने एक खास सरप्राइज दिलं आहे. याचा व्हिडीओ त्याने नुकताच इन्स्टाग्राम शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या आईला वाढदिवसादिवशी तिच्या आवडत्या ब्रँडमधून साड्या घेऊन दिल्या आहेत. याचा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहिलं आहे, “प्रिय आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपर्यंत तू माझ्यासाठी अनेक गोष्टी केल्यास त्याची परतफेड मी कधी करू शकेन की नाही…माहित नाही…पण किमान तुझ्या लाडक्या आणि आवडत्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक दुवा म्हणून मी कायम असेन. रोज घरी आल्यानंतर फेसबुकवर सेव्ह केलेल्या ‘सायली राजाध्यक्ष सारीज’ किती कमाल आहेत… मला अशाच साड्या हव्यात हे इतके दिवस सांगत होतीस. म्हणून तुझ्यासाठी प्लॅन केलेलं हे छोटंसं सरप्राइज. आणि हे सरप्राइज तुमच्या शिवाय कधीच शक्य झाला नसतं. धन्यवाद अश्विनी कासार, स्वाती खरे आणि सायली राजाध्यक्ष मॅम.”

हेही वाचा – “महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा…”, उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन, अभिनेत्याच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

पृथ्वीकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तो आईबरोबर तिच्या आवडीच्या ब्रँडमधील साड्या खरेदी करताना दिसत आहे. पृथ्वीकच्या आईच्या चेहऱ्यावर या सरप्राइजचा एक वेगळाच आनंदा पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पृथ्वीकच्या या पोस्टवर कलाकारमंडळींसह चाहत्यांनी त्याच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अश्विनी कासार, शिल्पा नवलकर, प्रथमेश परब, प्रियांका तेंडोलकर, तन्वी बर्वे, निखिल बने, अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – “लाखो लोकांची दिशाभूल…”, अयोध्येतील निकालाबद्दलच्या ‘त्या’ पोस्टवरून भडकला सोनू निगम, म्हणाला…

दरम्यान, पृथ्वीकच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर अभिनेत्याची दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वर्णी लागली आहे. दिया मिर्झाची ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म भेटीस येत आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून यामध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहेत. पृथ्वीक प्रतापसह अभिनेत्री सायली संजीव, सुहास शिरसाट पाहायला मिळणार आहेत. दिया मिर्झाची ही शॉर्ट फिल्म काय आहे? कधी प्रदर्शित होणार? आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात समोर येतील.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap surprise to mother on her birthday pps