Prithvik Pratap Wedding: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे. आपल्या दमदार अभिनयाची छाप मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत उमटवणाऱ्या पृथ्वीकने आज गुपचूप, कुठलाही गाजावाजा न करता प्राजक्ता हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अत्यंत साध्या पद्धतीने पृथ्वीक आणि प्राजक्ताने लग्न केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सामाजिक भान ठेवून त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? हे देखील स्पष्ट केलं आहे. पृथ्वीक म्हणाला, “मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत.”
U
u
“आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे, असं आम्हाला वाटतं,” असं पृथ्वीक म्हणाला.
लग्नासाठी पृथ्वीक आणि प्राजक्ताने खास लूक केला होता. प्राजक्ताने क्रिम कलरची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर तिने मोजकी ज्वेलरी आणि केसात गजरा माळला होता. तर पृथ्वीक पांढऱ्या रंगाच्या धोती सेटमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांच्या गळ्यात मोगऱ्याचा हार असून दोघं खूप आनंदी असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, पृथ्वीकने लग्नाचे फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. इतर कलाकार मंडळींसह चाहते पृथ्वीक व प्राजक्तावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री श्रुती मराठे म्हणाली, “मला आता खूप आनंद झाला आहे.” तर अमृता खानविलकर म्हणाली की, “अभिनंदन. गोड जोडी.” तसंच अश्विनी महांगडे, प्रथमेश शिवलकर, अक्षया नाईक, स्वानंदी टीकेकर, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, प्रथमेश परब, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.