‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिनं आपल्या दमदार अभिनयाचा ठसा मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही उमटवला आहे. अशा या बहुगुणी अभिनेत्रीला नुकताच सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यासंदर्भात तिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्रीला प्रियदर्शनी इंदलकरला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे शाखा कै. इंदिरा चिटणीस स्मृति विनोदी अभिनेत्रीच्या पुरस्कार गौरविण्यात आलं. याचे फोटो प्रियदर्शनीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये पुरस्कारसह अभिनेत्री पाहायला मिळत आहे. सुंदर अशा साडीमध्ये प्रियदर्शनी दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबासह पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे ‘या’ देशात गेले फिरायला, पाहा फोटो

हे फोटो शेअर करत प्रियदर्शनीनं लिहिलं आहे, “अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे शाखा कै. इंदिरा चिटणीस स्मृति विनोदी अभिनेत्री पुरस्कार…या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल शतशः आभार!…हास्यजत्रेशिवाय हे शक्य नव्हतं… सचिन गोस्वामी व सचिन मोटे तुम्हा दोघांमुळे आजपर्यंत अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. तुमच्या हातून घडल्याची आणखीन एक पोचपावती.” तसंच अभिनेत्रीने पुढे तिच्या शिक्षकाचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रियदर्शनीच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. संगीतकार, गायक सलील कुलकर्णी, अश्विनी कासार, श्याम माशलकर या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन”, “अभिनंदन यापुढे असेच पुरस्कार आपणांस मिळत राहो”, “अभिनंदन प्रियदर्शनी विनोदी अभिनेत्री म्हणून गुणगौव झाला हे आवडलं. आता विविध प्रकारच्या भूमिकेत तू पुढे यावं आणि असे पुरस्कार, शाबासकी मिळत जावी ही शुभेच्छा”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, पाहायला मिळाली मुख्य अभिनेत्रीची झलक

दरम्यान, प्रियदर्शनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, या वर्षाच्या सुरुवातीला २६ जानेवारीला तिचा ‘नवरदेव’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात अभिनेता क्षितीज दाते व मकरंद अनासपुरेबरोबर ती झळकली होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राम खाटमोडेंनी सांभाळली होती. गेल्या वर्षी तिचा ‘फुलराणी’ चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. २२ मार्चला या चित्रपटाला वर्ष पूर्ण झाले. विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी’ या चित्रपटात प्रियदर्शनी अभिनेता सुबोध भावेसह मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आलं. याशिवाय या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारने गौरविण्यात आलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar was honored with the best comedian award pps