मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गाव सोडून मुंबईत आले आहेत. मुंबईत हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. गेल्या वर्षभरामध्ये अनेक मराठी कलाकारांनी ‘स्वप्नातील घर’ खरेदीही केले. अक्षय केळकर, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, स्मिता शेवाळे, मीरा जोशी यांनी मुंबईत नवीन घरे घेतली. आता त्यामध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची भर पडली आहे आणि तो अभिनेता म्हणजे रोहित माने.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे रोहित प्रसिद्धीझोतात आला. रोहितला प्रेक्षक सावत्या म्हणूनही ओळखतात. काही दिवसांपूर्वीच रोहितने मुंबईत स्वत:च घर घेतले. रोहित मानेने दहिसर परिसरात हक्काचे पहिले घर खरेदी केले आहे. सोशल मीडियावर यासंबंधीची पोस्ट शेअर करीत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. आता रोहितने आपल्या पत्नीसह या नवीन घरात प्रवेश केला आहे. अभिनेत्याच्या पत्नीने नवीन घरातील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रोहितच्या पत्नीने पोस्ट करीत लिहिले, “घर हा शब्द खूप छोटा आहे; पण त्याचं वजन खूप मोठं आहे. या घराचं स्वप्न आपण एकत्र पाहिलं आणि ते एकत्र पूर्ण केलं. आज स्वत:च्या घरात फोटो काढताना फारच कमाल वाटत होतं. मम्मी, पप्पा तुमचे आभार! तुम्ही मला स्वप्नं बघायला शिकवली आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेहमीच पाठीशी उभे राहिलात.” रोहितच्या पत्नीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
रोहित माने मूळचा साताऱ्याचा. त्याचे वडील कामानिमित्त मुंबईत राहायचे. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचे म्हणून त्याच्या वडिलांनी सगळ्यांना मुंबईत बोलवून घेतले. आतापर्यंत रोहित अनेक भाड्यांच्या घरांत राहिला आहे; पण आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न त्याने नेहमी बघितले होते. आता रोहितने हक्काचे घर खरेदी करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे.