मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार हा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर आता घराघरात पोहोचला आहे. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात आपल्या विनोद शैलीमुळे वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकही या विनोदवीरांवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळतं आहे. अशातच हास्यजत्रेमधील अभिनेते समीर चौघुले यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे; ज्यामध्ये त्यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचे आभार मानले आहेत.
अभिनेते समीर चौघुले यांनी काही कारणास्तव सोनाली यांचे आभार मानले आहेत. हे कारण म्हणजे सोनाली यांनी समीर यांना भेटवस्तू म्हणून दिलेली चार्ली चॅप्लिन यांची मूर्ती. शिवाय सोनालींनी केलेलं समीर चौघुले यांचं भरभरून कौतुक. यानिमित्ताने समीर यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहून सोनाली यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा – Video: शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
समीर चौघुलेंनी सोनाली कुलकर्णींबरोबरचा फोटो शेअर करून लिहीलं आहे की, “कलाक्षेत्रात एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे अत्यंत हृदयापासून खुल्या दिलाने कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच.. माझ्या २९ वर्षांच्या कारकिर्दीत मी सहकलाकारांनी माझ्यावर केलेले निस्सीम प्रेमही अनुभवले आणि ईर्ष्या, जेलसी, इनसिक्युरिटी हे प्रकारसुद्धा अगदी जवळून बघितले…अनुभवले… आपल्याला इतरांच्या यशाचा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या यशाचा इतरांना होतो का? हा प्रश्न बरेचदा मला पडायचा…आपल्या जवळचे अनेक जण सोशल मीडियावर आपल्याबद्धल खूप वेगळे रिअॅक्ट होतात..पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं खरं स्वरूप अत्यंत वेगळं असतं…पण शेवटी हे सगळं कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून मी ग्रेसफुली स्वीकारायला ही शिकलो..असे प्रकार कदाचित फक्त आमच्या कलाक्षेत्रापुरते मर्यादित नसावेत..या पार्श्वभूमीवर सोनाली कुलकर्णीसारखे कलाकार असतात. देवाने ज्यांच्या शरीरात काळजा ऐवजी नदीचे विशाल पात्र बसवलेले असते…”
“सोनाली या आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रेमळ हास्यरसिक….आज माझ्या एका प्रहसनानंतर सोनाली कुलकर्णी यांनी माझ्या देवाची म्हणजेच “सर चार्ली चॅप्लिन” यांची एक अत्यंत सुंदर मूर्ती देऊन माझा गौरव केला..ही अत्यंत सुंदर मूर्ती पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार देवधर सर यांनी घडवली आहे..(देवधरांनी घडवलेली ही चार्ली सरांची दुसरी मूर्ती माझ्या घरी आली..पहिली श्री.सुहास काळे वपु काळे यांचे सुपुत्र यांनी दिलेली स्नेहभेट होती) सोनाली यांना ही मूर्ती पेण येथील स्नेही श्री विनायक गोखले यांनी भेट दिली होती.. पण सोनाली मला म्हणाली “समीर, ज्या क्षणी ही मूर्ती माझ्या हातात आली त्या क्षणी मला तुझी आठवण आली…बरेच दिवस या मूर्तीचे वजन मला पेलवता येत नव्हते…आज ती योग्य हातात देताना मला खूप आनंद होतोय”…ही तिची वाक्य माझ्यासाठी मोठा आनंदाचा सोहळा होता..देवाने स्वर्गातून पृथ्वीवर शिंपडलेल्या पंचामृताचा थेंब होता…”
तसेच पुढे समीर यांनी लिहीलं आहे की, “सोनाली कुलकर्णी सर्वोत्तम अभिनेत्री आहेत हे सर्वांनाच माहिती आहे..पण त्यांची भावना व्यक्त करण्याची पद्धत या कलाक्षेत्रातील त्यांचे माणूसपण आणि वेगळेपण ठळकपणे दर्शवत… सोनाली कुलकर्णी तुझे खूप खूप आभार…मनापासून आभार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर…..खूप आभार सोनी मराठी…..विशेष म्हणजे हा भाग जेव्हा चित्रित झाला…त्या दिवशी बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता..माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला…..कायमचा….”
हेही वाचा – Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक
दरम्यान, समीर चौघुले यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी हास्यजत्रे व्यतिरिक्त काही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘चंद्रमुखी’, ‘टाइमपास ३’, ‘जग्गु जुलियट’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.