‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे प्रसिद्धी झोतात आलेली शिवाली परब आता विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. १७ जानेवारीला तिचा ‘मंगला’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात शिवालीने प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं अनेक दिग्गज कलाकारांमंडळीसह चाहत्यांनी खूप कौतुक केलं. सध्या शिवाली ‘मंगला’ चित्रपटातील पडद्यामागच्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहे.
अभिनेत्री शिवाली परबने नुकताच ‘मंगला’ चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाली चित्रपटातील बंधिश गातानाचा सीन शूट करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला हा सीन एका श्वासात करायचा होता आणि तो तिने उत्कृष्टरित्या केला. त्यामुळे या सीनच्या शेवटी चित्रपटाच्या दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग येऊन शिवाली समोर हात जोडून तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
शिवालीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “‘मंगला’ …BTS … एक वेगळाच अनुभव, मंगला हे पात्र मला खूप काही शिकवून गेलं. या चित्रपटाच्या निमित्ताने मला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि काम करायला मजा आली. ही जी बंधिश आहे ती फार कठीण होती आणि चॅलेंजिंग होती. नाक बंद असल्यामुळे श्वास घेणं थोडं कठीण होतं आणि यात एका श्वासात बराच वेळ गायचं होतं. हे शूट करताना खूप मजा आली म्हणून आज हा व्हिडीओ तुमच्या बरोबर शेअर करते.”
तसंच शिवालीने ‘मंगला’ चित्रपटातील आणखी एक BTS व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगितला आहे. या व्हिडीओमध्ये मंगला म्हणजे शिवाली विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देताना पाहायला मिळत आहे. शिवालीने शेअर केलेले ‘मंगला’ चित्रपटातील BTS व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आले आहेत.
दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर काम लीलया सांभाळत आहे. तिने गेल्यावर्षी अखेरीस मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळत आहेत.