अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने शिवालीचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसते. या कार्यक्रमाबरोबरच अभिनेत्रीने चित्रपटातूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवाली परबची प्रमुख भूमिका असलेला ‘मंगला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता मात्र अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री शिवाली परब म्हणाली…
अभिनेत्री शिवाली परबने काही दिवसांपूर्वी नवशक्ती यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत “आपण आपल्या आयुष्यात कधीतरी कठीण काळातून जात असतो आणि मग आपण एक वेगळी उभारी घेतो, त्यानंतर कुठेतरी पुढे येतो, असा कुठला क्षण होता,” यावर बोलताना शिवाली परबने म्हटले, “माझं कॉलेज सुटल्यानंतर माझ्याबरोबर अशी एक वाईट गोष्ट घडली होती, तर मी या गोष्टीतून माघार घेतली होती. मी तेव्हा विचार केलेला की मला आता हे थिएटर वगैरे करायचं नाहीये. जे चार लोकं सांगत होते की हे वाईट फिल्ड आहे किंवा अमुक अमुक गोष्टी आहेत, त्यामुळे आपण या क्षेत्रात काम करायला नको आता थांबूयात, असं मला वाटत होतं. मी सहा महिने काहीच केलं नाही. अक्षरश: मी घरी बसून होते. कॉलेजला ड्रॉप लागला. सहा महिने मी फक्त बेडवर झोपून असायचे, बाकी काहीच करायचे नाही, त्या गोष्टीमुळे इतकी नैराश्यात गेले होते.”
“त्या सहा महिन्यांनंतर मला एका राज्यनाट्यासाठी एका ग्रुपने विचारलं की नाटकात काम करणार का? मला माहीत नाही, पण मी काही बोलायच्या आधी माझ्या पप्पांनीच म्हणून टाकलं की कर तू, बाहेर पड. शिक्षणात तुला अमुक काही बनायचं आहे, काहीच माहीत नाही. आता हे आलंय ना तुझ्याकडे, तर तू आता हे कर. मी सकाळी ३ वाजता उठून ४.३० च्या ट्रेनने कल्याणवरून ७.३० ला जोगेश्वरीला सरावासाठी जायचे. रात्री १२ ची ट्रेन पकडून घरी यायचे. दोन-अडीच तास झोपायचे. पुन्हा ३ वाजता उठून रिहर्सलला जायचे. असं साधारण मी एक ते दीड महिना केले. ते केल्यानंतर त्या दिग्दर्शकाकडून मला एका इव्हेंटसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून एक जॉब ऑफर मिळाली. त्या इव्हेंटमुळे मला ‘हास्यजत्रा’ मिळालं”, असे म्हणत शिवाली परबने तिच्या कठीण काळातून ती कशी बाहेर आली व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो कसा मिळाला यावर वक्तव्य केले आहे.
दरम्यान, शिवाली परब अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची मोठी संख्या आहे. आता ‘मंगला’ या चित्रपटानंतर अभिनेत्री कोणत्या नवीन भूमिकेतून भेटीला येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.