कित्येक वर्षांपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच प्रत्येक कलाकाराचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अशीच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे शिवाली परब. सध्या ती ‘पायल वाजे’ या तिच्या नव्या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवालीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्ट्रगल काळातील एक क्षण सांगितला.
‘पायल वाजे’ या गाण्याच्या निमित्तानं शिवाली परबनं ‘स्टार मीडिया मराठी’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला विचारलं गेलं, ‘शिवाली तू हास्यजत्रेमधून लोकांना हसवत असतेस; पण प्रत्येकाचा एक स्ट्रगल काळ असतो. त्या काळात प्रत्येकानं खूप काही केलेलं असतं. असा तुझ्या स्ट्रगलच्या काळातला कुठला क्षण आहे; जो आठवला तरी डोळ्यांतून पाणी येतं?’
हेही वाचा – “तुमचा लेखक कुठे आहे?” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त; म्हणाले…
यावर शिवाली म्हणाली, “मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा काही कारणामुळे मला ड्रॉप लागला होता. त्यानंतर मला पुढचे सहा महिने काही सुचतच नव्हतं. काय करावं कळतं नव्हतं. कारण- त्याच्या आधी मला एका जॉबची ऑफर आली होती, तेव्हा मी पप्पांना म्हटलं, मला जॉब करायचा नाही. कारण- मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. पण, मला ड्रॉप लागला आणि सगळंच बंद झालं. त्या सहा महिन्यांत माझ्याकडे एकांकिका, नाटक आदी काहीच काम येत नव्हतं. मी त्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करीत होती. पण नाही; सहा महिने मी घरात बसून काढले.”
हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेसाठी संपूर्ण मालिकेतील ‘हा’ सीन होता चॅलेजिंग; म्हणाली, “मला रात्री…”
पुढे शिवाली म्हणाली, “या काळात मला इतकं टेन्शन आलं होतं. मी काय करू? माझं आता सगळं करिअर संपलं, असं मला सतत वाटत होतं. कोणत्याही ग्रुपबरोबर मी जास्त जोडले गेले नाही. पण त्यानंतर मी ठरवलं. आपण पुन्हा कॉलेजला जायचं. वेगळं करिअर निवडून नव्यानं पुन्हा सुरुवात करायची. पण, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला तो ड्रॉप लागला ते बरं झालं. त्या ड्रॉपमुळे मला एक नाटक मिळालं. त्या नाटकामुळे नमाताई (नम्रता संभेराव)बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे मला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम मिळाला.” हा क्षण सांगताना शिवाली थोडी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, शिवालीचं नवं गाणं ‘पायल वाजे’ हे ५ ऑगस्टला प्रदर्शित झालं. त्या गाण्याला आतापर्यंत दोन लाख ५८ हजारपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. यापूर्वी शिवालीचं ‘साजणी तुला न कळले’ हे प्रदर्शित झालं होतं.