‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग फक्त महाराष्ट्र आणि देशातच नाही, तर जगभरात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करतं आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा घराघरात पोहोचला आहे आणि प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झालेला आहे. अशीच एक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार म्हणजे शिवाली परब. शिवालीनं आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिला ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ओळखलं जातं. अशा या ‘महाराष्ट्राची क्रश’ असणाऱ्या शिवालीनं चाहत्यांकडून कोणते-कोणते गिफ्ट्स पाहिजेत, याचा खुलासा केला आहे.
शिवालीचं अलीकडेचं नवं गाणं ‘पायल वाजे’ हे प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या नव्या गाण्यांचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. याच गाण्याच्या निमित्तानं तिनं एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी शिवालीनं चाहत्यांकडून तिला कोणते गिफ्ट्स पाहिजेत? याविषयी सांगितलं.
हेही वाचा – जेव्हा तुझी मंगळागौर होईल, तेव्हा? ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…
मुलाखतीमध्ये शिवालीला विचारलं होतं की, ‘तुला पैजण कोणी गिफ्ट म्हणून दिलं आहेत का? की तू स्वतःसाठी स्वतः घेतलेस?’ ती म्हणाली की, “मला पहिल्यांदा पैजण नमा ताईनं (नम्रता संभेराव) गिफ्ट्स म्हणून दिले होते. तिनं मला मोठं, जाड असे पैजण दिले होते. ते माझ्याकडे अजूनही आहे. ते खूप सुंदर आहे. बाकी मी माझेच घेतलेत.”
त्यानंतर तिला विचारलं की, ‘मुलांकडून काही गिफ्ट्स आलेत का?’ यावर शिवाली म्हणाली, “नाही. सगळी मुलं बोरिंग आहेत. गिफ्ट्चं देत नाही. मला खरंच गिफ्ट्स द्या, खूप आवडतात. मला गिफ्ट्स पाठवा, चालतील.” त्यानंतर मुलाखदार म्हणाली की, ‘हास्यजत्रेच्या सेटवरती शिवालीला गिफ्ट्स पाठवा. पैजण चालतील?’ यावर शिवाली म्हणाली, “हो चालतील. टिव्ही वगैरेही चालेल. म्हणजेच मला मोठं गिफ्ट देखील चालेल. फ्रिज चालेल. माझ्या घरी काय नाहीये बरं…हा मला वॉशिंग मशीन दिलीत तरी चालेल. अजून माझ्याकडे काय नाहीये बरं…आणि मुंबईत एक घर पण चालेल. हे मला जर दिलं तर मज्जाचं येईल,” असं मजेत शिवाली म्हणाली.