अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. पण त्याचबरोबरीने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं. कामामुळे चर्चेत असणाऱ्या वनिताला मराठी, हिंदी पाठोपाठ आता दक्षिणात्य मनोरंजनसृष्टी खुणावत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वनिता खरातने ‘कबीर सिंग’ या शाहिद कपूरच्या चित्रपटात केलेल्या कामाचंही खूप कौतुक झालं. त्यानंतर मराठीबरोबरच तिला हिंदी चित्रपटांच्याही अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. ‘सकाळ’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचे फ्युचर प्लॅन्स सांगितले आहेत.
“आता पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये कधी दिसणार?” असं विचारल्यावर ती म्हणाली, “मला हिंदी इंडस्ट्रीमधून बऱ्याच ऑफर्स येत आहेत. पण सध्या माझ्या हातात बरीच काम असल्याने मला त्या स्वीकारता येत नाहीयेत. मला एखाद्या विशिष्ट भाषेमध्ये काम करायचं नाही. मराठी असो, हिंदी असो…मला जिथे काम करायला मिळेल आणि जिथे मला आवडेल तिथे मी काम करत राहीन. पण माझं सगळ्यात आवडतं आहे ते टॉलिवूड. मला दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टी खूप आवडते. मी दक्षिणात्य कलाकृतींमध्ये काम करताना कधी दिसेन हे मी आत्ता सांगू शकत नाही. मला खरंच खूप आवडेल तिथे काम करायला. मराठी माझी मातृभाषा आहे, हे माझं प्रेम आहे, माझं कम्फर्ट झोनही आहे. पण मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायचंय.”
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली “मी पोस्ट शेअर केली की…”
आता वनिताच्या या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं असून मराठी आणि हिंदी पाठोपाठ ती आता दाक्षिणात्य कलाकृतींमध्ये कधी दिसणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.