‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक आहे. या शोमधील सर्व कलाकार हे प्रेक्षकांचे लाडके आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामार्फत हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतात. नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर हे आणि असे इतर कलकार प्रेक्षकांचे मन जिंकून घेताना दिसतात. आता अभिनेत्री वनिता खरात एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम वनिता खरात काय म्हणाली?
वनिता खरातने नुकताच ‘अल्ट्रा बझ मराठी’बरोबर संवाद साधला. त्यावेळी वनिताने म्हटले, “प्रेमाच्या बाबतीत पकडले गेले नाही. पण, कॉपी करताना खूप वेळा पकडले गेले. हिंमत तर एवढी असायची की गाईड वगैरे ठेवून आम्ही कॉपी करायचो. तेव्हा पकडले गेलोय. शाळेत खूप दंगा, मजा केलीय. सातवीपर्यंत आम्ही मुलं-मुली एकत्र असायचो. मग आठवीपासून मुलींची शाळा झाली. पण, आमच्या बाजूलाच मुलांची शाळा होती. एकाच वेळी आमची शाळा सुटायची. मग बस स्टॉपवरती मुलं-मुली कोण पाखरू दिसतंय वगैरे म्हणत असायचे”, अशी आठवण अभिनेत्रीने सांगितली आहे.
वनिता खरात अनेकदा विविध किस्से शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच नवशक्ती या यूट्यूब चॅनेलबरोबर अभिनेत्रीने संवाद साधला होता. तिला तिचे ९० च्या दशकातील आवडते गाणे सांगायचे होते. त्यावेळी तिने ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं’ हे आवडते गाणे असल्याचे सांगितले होते. हे गाणे आवडण्यामागचे कारण सांगताना अभिनेत्रीने म्हटले होते की, तिचा एक बॉयफ्रेंड होता. त्याच्या फोनची रिंगटोन हे गाणे होते. माझे ब्रेकअप झाल्यानंतरही मी हे गाणे ऐकत असे, असा किस्सा वनिता खरातने सांगितला होता.
अभिनेत्री तिच्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरांत पोहोचली. जस्टीस फॉर गुड कटेंट, सलमान सोसायटी, इलूइलू, कबीर सिंग, एकदा येऊन तर बघा, सरला एक कोटी, लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह, अशा कार्यक्रम व चित्रपटांत ती दिसली आहे. ‘कबीर सिंग’मध्ये तिने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.