‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेंना ओळखलं जातं. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या समीर यांचं त्यांच्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे. सोशल मीडियाद्वारे पत्नीसह फोटो पोस्ट करत ते आपलं प्रेम व्यक्त करतात. शिवाय काही मुलाखतींमध्येही त्यांनी पत्नीचा उल्लेख करत तिचं कौतुक केलं. आता समीर यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
आणखी वाचा – ठरलं हो! अभिनेत्री वनिता खरात ‘या’ महिन्यात बॉयफ्रेंडसह विवाहबंधनात अडकणार, लग्नाची जोरदार तयारी सुरू
समीर व त्यांची पत्नी कविता यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. समीर आपल्या कामामधून वेळ काढत कुटुंबासह फिरायला जातात. पत्नी कवितालाही वेळ देतात. आता लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त तर त्यांनी पत्नीला खास सरप्राईज दिलं.
समीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कविता यांच्यासह एक फोटो शेअर केला. लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त समीर पत्नीला कँडल लाइट डिनरला घेऊन गेले होते. त्यादरम्यानचाच फोटो शेअर करत त्यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. समीर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये जेवणाचा टेबल अगदी गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्टच्या आकारामध्ये सजवलेला दिसत आहे.
समीर आणि त्यांची पत्नी कविताची लव्हस्टोरीही अगदी हटके आहे. या दोघांचा प्रेमविवाह आहे. समीरने याबाबत लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं होतं. एकाच नाटकातल्या ग्रुपमध्ये दोघंही एकत्र होते. यादरम्यानच दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समीर व कविता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.