‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तू त्याच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर घराघरांत पोहोचला. सध्या तो भलताच चर्चेत आहे. दत्तू त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने २३ मेला अगदी गुपचूप लग्न उरकलं. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ने त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. त्याचनंतर दत्तूच्या लग्नाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. आता त्याच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल होत आहेत.
दत्तूने स्वाती घुनागे हिच्याशी अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनीही त्याला लग्नाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. तसेच लग्नाचे फोटो शेअर करत दत्तून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. चाहते दत्तूचं अभिनंदन करत आहेत आणि पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान आता दत्तू आणि त्याच्या पत्नीच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दत्तूने त्याच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याचं खास आयोजन केलं होतं. त्याने रिसेप्शन अगदी थाटामाटात केलं. त्याच्या रिसेप्शन सोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये दत्तू व त्याची पत्नी अगदी उठून दिसत आहे.
दत्तूची पत्नी लेहंग्यामध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तर दत्तूच्या चेहऱ्यावरील हास्यही पाहण्यासारखं आहे. प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात आदी कलाकारांनी दत्तूच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. याआधीही दत्तूच्या प्री-वेडिंगचीही बरीच चर्चा रंगली होती.