New Entry in Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहे. नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजनमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईज येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील वेगवेगळ्या स्किट्समधील निरनिराळी पात्रं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात आणि प्रेक्षक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव देखील करतात. काही स्किट्समध्ये नेहमीच नवीन पात्रं आपल्याला पाहायला मिळतात. ‘सून सासू सून’ या प्रेक्षकांच्या सगळ्यात जास्त आवडत्या स्किटमध्ये एक नवीन एन्ट्री आता होऊ घातली आहे.
मामंजीचे पात्र कोण साकारणार?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मामंजींची मंचावर एन्ट्री होणार आहे. आजपर्यंत मामंजीचा आपण फक्त आवाज ऐकला आहे पण हे मामंजी नक्की कोण असणार आणि कशाप्रकारची एन्ट्री ते घेणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे मामंजीच्या रुपात दिसणार आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील लोकप्रिय स्किट
या स्किटमध्ये वनिता खरात सासू आणि चेतना भट्ट व नम्रता संभेराव या २ सुना आहेत. सासू सुना यांच्यातील वाद मजेशीर पद्धतीने दाखवण्यात येतात. त्यात नेहमी उसाच्या मळ्यातून फोन कॉलवर फक्त आवाजाद्वारे मामंजीचं पात्र दाखवण्यात येत होतं. ‘ठिव फोन’ या खास डायलॉगने नेहमी हे स्किट संपायचं. पण आता चक्क मामंजी उसाच्या मळ्यातून थेट हास्यजत्रेच्या मंचावर येणार आहेत. आजवर मामंजी कधी येणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
पाहा व्हिडीओ-
सचिन गोस्वामी मामंजीच्या रूपात एन्ट्री करणार आहेत. मामंजीची विशेष एन्ट्री या बुधवारी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.