‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे एक नवीन समीकरण आता जुळून आलं आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. गौरव मोरे, वनिता खरात, दत्तू मोरे, निखिल बने, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब असे या कार्यक्रमातील सगळेच विनोदवीर प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. आता सोनी मराठी वाहिनी नववर्षांच्या पार्श्वभूमीवर हास्यजत्रेच्या चाहत्यांना खास सरप्राईज देणार आहे हे गिफ्ट नेमकं काय आहे जाणून घेऊयात…
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करता यावं यासाठी सोनी मराठी वाहिनीने विशेष निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरला संपूर्ण दिवस हास्यजत्रेतील गाजलेली स्किट्स प्रेक्षकांना दाखवली जाणार आहेत. याशिवाय रात्री ९ वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
“वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वर्षअखेरीस संपूर्ण दिवस आपल्या भेटीस येणार आहे.” असं सोनी मराठीकडून सांगण्यात आलेलं आहे.
हेही वाचा : आजोबांच्या धाकामुळे माधुरी दीक्षितने शेणाने सारवलेलं अंगण; कोकणातील आठवणी सांगत म्हणाली, “आमच्या गावी…”
दरम्यान, येत्या नववर्षात हास्यजत्रेचे कलाकार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. पुढच्या वर्षी ९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) UNSW विज्ञानगृहात हा प्रयोग पार पडणार आहे.