महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्‍तव्‍य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले. यामुळे सगळ्याच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय वर्तुळात यावर बऱ्याच लोकांनी टीका केली. शिवाय मनोरंजन क्षेत्रातीलही बऱ्याच लोकांनी या प्रकरणावर त्यांची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला. प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम यांनी एक फेसबुक पोस्ट करत भिडे यांच्या वक्तव्यावर टीका केली तर अतुल कुलकर्णी यांनीही महात्मा गांधींना उद्देशून एक कविता शेअर केली. याबरोबरच इतरही कलाकार या प्रकरणावर व्यक्त झाले. काहींनी या कलाकारांचं कौतुक केलं तर काहींनी त्यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा : कपूर किंवा बच्चन नव्हे तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब; एकूण संपत्ती ऐकून व्हाल चकित

आता एकूणच या परिस्थितीवर आणि कलाकारांच्या व्यक्त होण्याने समाजात निर्माण होणारी तेढ याबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी यांनीही नुकतीच पोस्ट केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी समाजात विष पसरवण्याच्या वृत्तीवर भाष्य केलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये सचिन गोस्वामी म्हणतात, “समाजात नियोजनबद्धरीतीने विष कालवणे सुरू आहे..आता ज्याचे खरंच देशावर प्रेम आहे अशा नागरिकांनी समाजातील या विषबाधा झालेल्या आपल्या परिचयातील युवकांना योग्य समुपदेशन करुन, सत्य सांगून, वास्तवाची जाणिव करून दिली पाहिजे..आपल्या परिसरापुरता जरी प्रयत्न केला तरी समाजातील एकोपा वाढीस मदत होईल.. आता तटस्थता उपयोगाची नाही.. आपापल्या माध्यमांनी समाज निर्विष करू या..संवेदनशील होऊ या….माणूस होऊ या…”

सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. लोकांनी त्यांनी मांडलेल्या या विचारांचं कौतुक केलं आहे तर काही लोकांनी अशा समुपदेशनाचा काहीच फायदा नाही असं म्हंटलं आहे. एका युझरने लिहिलं की, “”अंधभक्तांपुढे डोके फोडले तरी काय उपयोग नाही सत्य स्वीकारायला कोणीच तयार नाही आपले सजेशन चांगले आहेत पण ते फक्त आपल्या विचारांची माणसं समजू शकतील.” अशा बऱ्याच प्रतिक्रिया सचिन यांच्या पोस्टवर आपल्याला पाहायला मिळतील.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra writer sachin goswami viral facebook post on controversial statements avn
Show comments