छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदवीरांना नवीन ओळख मिळाली आणि ते अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले. याच कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुले यांनी आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून खळखळून हसवणारे समीर चौघुले आता नवाकोरा कार्यक्रम घेऊन येत आहेत. या कार्यक्रमाद्वारे दीड तास धमाल किस्से, गप्पा मनोरंजन होणार आहे. यासंदर्भात नुकतीच समीर चौघुलेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
समीर चौघुले यांच्या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’. या कार्यक्रमाचं पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ – समीर चौघुले…प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असतं, जे संधीच सोनं करतात त्यांना संसाराची विंडोसीट मिळते…तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असतं जे नेहमी पायदळी तुडवलं जातं…तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे ‘एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस’…लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय ‘साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणं’…काही जणांच्या मते लग्न म्हणजे ‘मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’मध्ये उडी मारणे’ वगैरे वगैरे…‘प्रेम’ आणि ‘लग्न’ यांच्या जगभरात वेगवेगळ्या व्याख्या आहेत…रसिक हो…यातली नेमकी तुमची व्याख्या कोणती? सांगता येईल?…चला जाणून घेऊया…”
“आयुष्यात सुखी होण्यासाठी गुदगुल्या करणाऱ्या, मजेशीर, हास्यकल्लोळ उसळवणाऱ्या महत्वाच्या टिप्स घेऊन येतायत सदाबहार युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले…एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथा कथनाचा कार्यक्रम घेऊन ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’…हसत-खेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेचं…’सम्या सम्या मैफिलीत माझ्या’…सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे,” असं समीर यांनी लिहिलं आहे.
समीर चौघुलेंच्या या पोस्टवर इतर कलाकारमंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री शिवाली परब, वनिता खरात, स्पृहा जोशी, नम्रता संभेराव, प्रसाद ओक, अभिजीत, खांडकेकर, जयवंत वाडकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच ‘देव करो आणि याचे प्रयोग जगभरात हाऊसफूल्ल होवो’, अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd