‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. आपल्या विनोदी शैलीने प्रभाकर मोरे यांनी प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कोकणी बोलीभाषेमुळे त्यांना ‘चिपळूणचा पारसमणी’ म्हणूनही संबोधले जाते. प्रभाकर मोरे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभाकर मोरे अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावरही अनेकदा ते आपली पत्नी व मुलांबरोबरचे फोटो शेअर करीत असतात. दरम्यान, मोरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टवरून प्रभाकर मोरे यांची लेकही लवकरच अभिनय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. प्रभाकर मोरेंनी त्यांच्या लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांची मुलगी स्क्रीनसमोर उभी असल्याचे दिसून येत आहे. स्क्रीनवर प्रभाकर मोरे आणि ती सीन करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत त्यांनी लिहिलं “ ‘परदा’ लघुपट. माझ्या लेकीचा पहिलाच प्रोजेक्ट आणि तोही माझ्याबरोबर. खूप अभिमान वाटत आहे.” मोरे पहिल्यांदाच त्यांच्या लेकीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहेत.

मोरेंची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करीत प्रभाकर मोरेंचे व त्यांच्या लेकीचे अभिनंदन केले आहे. प्रभाकर मोरे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अनेक वर्षे ते आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. मोरेंनी सुप्रसिद्ध निर्माते व लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केले. आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.