‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत नुकतेच धनूचे लग्न झाल्याचे पाहायला मिळाले. धनूच्या लग्नासाठी सूर्याने पाच लाखांची उचल घेतली होती. ते कर्ज त्याला लवकरात लवकर परत करायचे आहे, नाही तर त्याच्या घरावर जप्ती येऊ शकते. त्यामुळे सूर्याचे संपूर्ण कुटुंब तणावात असल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) मालिकेत सावलीच्या आयुष्यातही मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सावलीच्या लहान भावाला नुकतेच दवाखान्यात दाखल केले होते. त्यासाठी तिला पैशांची गरज होती. तिने भैरवीकडे मदत मागितली; पण भैरवीने तिला मदत न करता तिचा अपमान केला. त्यानंतर तिला जगन्नाथने मदत केली. जेव्हा हे सारंगला समजले तेव्हा सावलीने त्याच्याकडे मदत न मागितल्याने त्याला वाईट वाटले. आता बिझनेसच्या निमित्ताने मेहेंदळे व जगताप कुटुंबाची भेट होणार आहे. लाखात एक आमचा दादा व सावळ्याची जणू सावली या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ व ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकांचा महासंगम

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तुळजा आनंदात राजश्रीला सांगते की, तुझ्याकडची हर्बल हळद विकत घ्यावी म्हणून आपण रूपम कॉस्मेटिक्स’ला मीटिंगसाठी मेल केला होता ना, त्यांनी आपल्याला अपॉइंटमेंट दिली आहे. राजश्री म्हणते की, तू सांग फक्त कुठे जायचं आहे. तुळजा तिला सांगते की, पुण्याला जायचं आहे. त्यावर राजश्री म्हणते की, पण दादाचं काय?

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तिलोत्तमा आणि कुटुंबातील इतरांना सारंग सांगतो की राजश्री प्रॉडक्टकडून काही माणसं भेटायला येणार आहेत. तिलोत्तमा म्हणते की, या हर्बल हळदीची जोड मिळाली तर ‘रूपम कॉस्मेटिक्स’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. तर, सारंगचा भाऊ मनातल्या मनात म्हणतो की, या गावठी लोकांशी मी ही डील होऊच देणार नाही. दुसरीकडे तुळजा व राजश्री आनंदात असल्याचे दिसतात. राजश्रीला तुळजा म्हणते की, आता येणारी वेळ आपली असेल.

हा प्रोमो शेअर करताना, ‘बिझनेसच्या निमित्ताने मेहेंदळे आणि जगताप कुटुंबं एकत्र येतील की नाती बिघडतील?’, अशी कॅप्शन दिली आहे. आता या मालिकांच्या महासंगमामध्ये नेमकं काय घडणार? जगताप व मेहेंदळे कुटुंब एकत्र येणार की कट-कारस्थानांमुळे त्यांच्यातील संबंध बिघडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.