मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम चित्रपट निर्माण करीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेक दिग्गज व्यक्तींमध्ये महेश कोठारे(Mahesh Kothare)यांचे नाव घेतले जाते. ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘धुम धडाका’, ‘माझा छकुला’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी महेश कोठारे यांना ओळखले जाते. विशेष बाब म्हणजे अभिनयाबरोबरच ते दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उत्तम काम करत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)देखील या क्षेत्रात उत्तम काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी त्याचे मोठे कौतुक होताना दिसले. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील त्याचे कौतुक केले होते. महेश कोठारे यांच्या ‘माझा छकुला’ या चित्रपटात आदिनाथने बालकलाकाराची भूमिका साकारली होती, तर ‘झपाटलेला २’ मध्येही आदिनाथ महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आता बाप-लेकाची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
सध्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्काराची मोठी चर्चा सुरू आहे. या सोहळ्यात महेश कोठारे व आदिनाथ कोठारे यांनी एकत्र हजेरी लावली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी एकत्र डान्सही केला आहे. ‘कजरा रे’ या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. परफॉर्मन्सच्या शेवटी ते एकमेकांना मिठीही मारताना दिसत आहेत. कलाकार टाळ्या वाजवत त्यांच्या डान्सला दाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ ‘द फिल्मी टाऊन मराठी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये झी मराठी वाहिनीला टॅग करण्यात आले आहे. या सोहळ्यात निवेदिता सराफ यांचा त्यांच्या कारकिर्दीसाठी सन्मानही करण्यात येणार आहे. निवेदिता सराफ, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे असे अनेक कलाकार एकत्र दिसत आहेत.
दरम्यान, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. २५ वर्षे पूर्ण झाल्याने मोठा जल्लोष होताना पाहायला मिळत आहे. ८ मार्चला हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रींनीदेखील झी चित्र गौरव पुरस्कारात हजेरी लावत प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच श्रेया बुगडे, ओंकार भोजने, गौरव मोरे हे आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.