‘तू झुठी मैं मक्कार’, ‘दे दे प्यार दे’, ‘मलंग’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमांची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ प्रोडक्शनकडून करण्यात आली आहे. आता हे निर्माते लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे ‘देवमाणूस’. येत्या २५ एप्रिलला हा मल्टीस्टारर सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. याचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे. आता लवकरच ( १३ फेब्रुवारी ) याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘देवमाणूस’ सिनेमाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टर्समध्ये प्रेक्षकांना सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा पहिला लूक पाहायला मिळत आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांचा खूपच साधा पण इंटेन्स लूक आपल्याला या पोस्टमध्ये पाहायला मिळतो. त्यांची भेदक नजर, त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. तसेच अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा मायाळू आणि मनमोहक लूक लक्ष वेधून घेणारा आहे. दोघेही या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. तर, सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. अशा या अनोख्या पोस्टर्समुळे ‘देवमाणूस’च्या टीझरमध्ये नक्की काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे.

तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे. ज्यामध्ये अभिनेते महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक नवी आणि आकर्षक कथा घेऊन येणार आहे.

सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव देईल. उत्तम कलाकार यात आहेत ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो. आम्ही निर्माण केलेलं हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.” तर, निर्माते अंकुर गर्ग सांगतात, “देवमाणूससारख्या सिनेमामार्फत मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे हा आमच्यासाठी एक रोमांचक नवीन अध्याय आहे.”

Story img Loader