Mahira Sharma on Dating Mohammed Siraj: अभिनेत्री माहिरा शर्मा सध्या फार चर्चेत आहे. त्याचं कारण तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. माहिराचं नाव सध्या भारतीय क्रिकेट टीममधील एका खेळाडूशी जोडलं जात आहे. तो क्रिकेटर म्हणजे मोहम्मद सिराज होय. दोघेही बऱ्याच दिवसांपासून डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता माहिराने तिच्या व मोहम्मद सिराजच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
माहिरा शर्माने अलीकडेच फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितलं. तिने क्रिकेटर मोहम्मद सिराजबरोबरच्या तिच्या नात्याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. “लोक माझं नाव वेगवेगळ्या लोकांबरोबर जोडतात. मी काम करत असेन तर अगदी माझ्या सहकलाकारांशी नाव जोडतात आणि व्हिडीओ एडिट करतात. खरं तर हे माझ्या नियंत्रणात नाही आणि मी या गोष्टींना फार महत्त्वही देत नाही,” असंही माहिराने नमूद केलं. कोणी तिच्याबद्दल चांगलं बोलत असेल वा वाईट ती त्यावर प्रतिक्रिया न देणं पसंत करते, असं माहिराने सांगितलं.
माहिरा म्हणाली, “मी सध्या कोणालाच डेट करत नाहीये आणि कोणाचं काही नाहीये.” तिला तिच्या व मोहम्मद सिराजच्या डेटिंगच्या कमेंटबद्दल विचारल्यावर तिने हे उत्तर दिलं.
माहिराच्या आईनेही दिलेली प्रतिक्रिया
“हे काय बोलताय तुम्ही? असं काहीही नाही. लोक तर काहीही बोलतात. आता माझी मुलगी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे लोक तोंड उघडून तिचे नाव कोणाशीही जोडतील, मग आम्ही त्या गोष्टी खऱ्या समजायच्या का? ही बातमी पूर्णपणे खोटी आहे,” असं माहिरा शर्माची आई सानिया म्हणाल्या होत्या.
माहिरा सलमान खानच्या टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस १३’मध्ये पारस छाबराबरोबर दिसली होती. माहिरा व पारस रिलेशनशिपमध्ये होती. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना चार वर्षे डेट केले आणि यादरम्यान ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. स्वतः पारसने त्याच्या शोमध्ये याचा खुलासा केला होता. काही काळानंतर त्यांना वाटलं की ते एकमेकांसाठी योग्य जोडीदार नाहीत, त्यामुळे त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर माहिरा सिंगल आहे, त्यामुळे तिच्याबद्दल बऱ्याच चर्चा होत असतात.