Zee Marathi Chal Bhava Cityt Show : टेलिव्हिजनवरच्या काही लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. ‘वादळवाट’, ‘अवघाची हा संसार’, ‘असंभव’, ‘आभाळमाया’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कळत नकळत’ या सदाबहार मालिका चाहत्यांच्या आजही आठवणीत आहे. ‘झी मराठी’वरच्या अशाच एका मालिकेने रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. त्या मालिकेचं नाव आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेचा शेवटचा भाग २२ जानेवारी २०२३ रोजी पार पडला. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे ही स्टार जोडी ऑनस्क्रीन एकत्र काम करत होती.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यश-नेहाची केमेस्ट्री, नेहाची चिमुकली लेक परी ही सगळी पात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. अगदी आजही श्रेयस आणि प्रार्थनाकडे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा भाग सुरू करा, अशी मागणी प्रेक्षक करतात. यावरून मालिकेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. या मालिकेचा दुसरा भाग केव्हा येईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, लवकरच या मालिकेची स्टारजोडी एका कार्यक्रमात एकत्र परफॉर्म करताना दिसणार आहे.
सध्या ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. या शोचं होस्टिंग अभिनेता श्रेयस तळपदे करत आहे. या शोमध्ये एका टास्कदरम्यान प्रमुख पाहुणी म्हणून प्रार्थना बेहेरे उपस्थित राहणार आहे. यावेळी कोरिओग्राफर आशिष पाटील, प्रार्थना आणि श्रेयस अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या यश-नेहाला एकत्र डान्स करण्याची विनंती करतो.
यानंतर प्रार्थना आणि श्रेयस ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शीर्षकगीतावर रोमँटिक डान्स करतात. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, लाडकी जोडी ऑनस्क्रीन पुन्हा एकत्र दिसल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
दरम्यान, प्रार्थना व श्रेयस यांचा हा रोमँटिक डान्स २३ मार्चला रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांना ‘झी मराठी’च्या ‘चल भाव सिटीत’ या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. नेटकऱ्यांनी या शोच्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.