प्रख्यात दिग्दर्शन रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिकांनी ९०च्या दशकातील छोटा पडदा चांगलाच गाजवला होता. या मालिकांपैकी एक म्हणजे ‘श्री कृष्ण’ मालिका. या मालिकेतील कलाकारांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. या कलाकारांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही त्या पात्रांद्वारेच ओळखलं जाऊ लागलं होतं. या मालिकेत स्वप्नील जोशी, दीपक देऊलकर असे मराठी कलाकार झळकले होते. याशिवाय या मालिकेत आणखी एक कलाकार होता, ज्याने मराठी मालिकेत अभिनेता, लेखक म्हणून काम केलं आहे.
रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेला हा अभिनेता, लेखक म्हणजे मिहीर राजडा. ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये मिहिर झळकला होता. या मालिकेत त्याने आनंद शाहचं पात्र साकारलं होतं, जे चांगलंच गाजलं होतं. तसेच मुक्ता बर्वे व उमेश कामात यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतही मिहिर झळकला होता. याशिवाय मिहिरने अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. एवढंच नव्हे तर अभिनया व्यतिरिक्त त्याने मराठी मालिकेच्या लेखनाची जबाबदारी देखील सांभाळली होती. ‘दार उघड बये’ या मालिकेची कथा व पटकथा लेखन मिहिरने केलं होतं.
हेही वाचा – मालिकेच्या सेलिब्रेशन केकवर देवीचा फोटो, युजरने आक्षेप घेतल्यावर ‘झी मराठी’ने दिलं स्पष्टीकरण, लिहिलं…
मिहिरने मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘माय डॅड्स वेडिंग’, ‘तू मी आणि अमायरा’ या आगामी मराठी चित्रपटांचं लेखन मिहिरने लोकेश गुप्ते यांच्यासह केलं आहे. अशा या बहुगुणी मिहिरने रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ मालिकेत भक्त प्रल्हाद व तरुण सुदामाची भूमिका साकारली होती. यासंदर्भातली पोस्ट रामानंद सागर यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आली असून ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
दरम्यान, सध्या मिहिर राजडा ‘दंगल’ वाहिनीवरील ‘आईना’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.