‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मन धागा धागा जोडते नवा’मधील आनंदीनं मोठं पाऊल उचललं आहे. स्वतःच्या भावाचं आयुष्य वाचवण्यासाठी आनंदीनं सार्थकाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. सार्थकच्या आईनं घातलेल्या अटी स्वीकारून आनंदी सार्थकपासून दूर झाली आहे. त्यामुळे आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिका ६ वर्षांचा लीप घेणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेचा नवा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीलाच सार्थक म्हणतोय की, गेल्या ६ वर्षात मी पहिल्यांदाच तुमच्या नावाने देवाला फुल वाहायला विसरलो आनंदी. त्यानंतर सार्थक फुलवाल्याकडे गुलाबाचं फुल मागतो. पण फुलं संपली असं फुलवाला सांगतो. तितक्यात सुखदा नावाच्या नव्या पात्राची एन्ट्री होते. “एक फुल चालेलं?”, असं ती सार्थकला विचारते. तेव्हा सार्थक ते फुल घेतो आणि पैसे देतो. पण सुखदा पैसे नाकारते आणि म्हणते, “एक स्माइल द्या आणि थँक्यू म्हणा.” त्यावेळी सार्थक तिला फक्त थँक्यू म्हणतो. त्यामुळे सुखदा विचारते आणि स्माइल? सार्थक म्हणतो, “काही कारण वगैरे पाहिजे ना हसायला.” तेव्हा सुखदा म्हणते, “एकदा हसू तर बघाल. आनंदी व्हाल.” आता याच सुखदाच्या येण्याने सार्थकच्या आयुष्यात कोणतं नवं वळणं येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण हा प्रोमो पाहून आनंदीचं काय झालं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

हेही वाचा – रोहित शेट्टीला ‘या’ स्पर्धकामध्ये दिसतोय ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता, कौतुक करत म्हणाला…

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेच्या या नव्या प्रोमोवर आनंदी विषयी अनेकांनी विचारलं आहे. “आनंदी कुठे गेली?”, “आनंदीचा मृत्यू झाला का?”, “आनंदी सोडून गेली वाटतं?”, “सार्थक आणि आनंदीची जोडी छान होती”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशपांडे सुखदा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ६ वर्षांनंतर या मालिकेतून पुन्हा एकदा मयुरी मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’बरोबर मयुरीची ही पहिलीच मालिका आहे. सुखदा या पात्राविषयी सांगताना मयुरी म्हणाली, “मी जवळपास ६ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. खरं सांगायचं तर खूप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेलं आहे.”

हेही वाचा – शरद पवार आणि ‘झपाटलेला’ चित्रपटाचं आहे खास कनेक्शन, महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

“आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखिल पूर्ण होतेय. सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून उलगडेलच.”, असंही मयुरीनं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dhaga dhaga jodte nava marathi serial taking 6 years leap new promo out pps