लग्नानंतर अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकल्याचं आपण याआधी पाहिलेलं आहे. बॉलीवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या आहेत. मराठी कलाविश्वातील अशाच एका अभिनेत्रीने काही वर्षांआधी अभियन सोडून परदेशात स्थायिक होण्याच निर्णय घेतला. ही अभिनेत्री आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजेच अभिनेत्री नेहा गद्रे. सध्या नेहाचे होळी सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत आले आहेत.
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. परंतु, सध्या ती अभिनयापासून दूर आहे. वैयक्तिक आयुष्यात २ मार्च २०१९ मध्ये तिने ईशान बापटशी विवाह केला. सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियात राहतात.
परदेशात स्थायिक झालेली नेहा दिवाळी, होळी असे भारतीय सण मोठ्या आनंदाने साजरे करत असते. नुकतेच तिचे होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या होळी सेलिब्रेशनमध्ये नेहा आपल्या पतीबरोबर धुळवड खेळत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. दोघेही बॉलीवूड गाण्यांवर थिरकत होळी खेळले.
हेही वाचा : ‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा..’
परदेशात राहून अभिनेत्रीने आता एका वेगळ्या क्षेत्रात करिअर केलं आहे. जर्मन भाषा आत्मसात करून तिने पदवी मिळवली आहे. तिला एक गोंडस मुलगी देखील आहे. दरम्यान, नेहाच्या होळी सेलिब्रेशनच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.