मराठी मनोरंजनक्षेत्रातील अनेक कलाकार अभिनय क्षेत्राबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही प्रगती करताना दिसत आहे. गेल्या वर्षात अनेक कलाकारांनी नवनवीन वस्तू खरेदी केल्या आहे. काहींनी आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले तर काहींनी नवी आलिशान कार. अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी-दिघे, अपूर्वा मोरे, मिताली मयेकर, सोनाली कुलकर्णी, ऋतुराज फडके या कलाकारांनी नवी गाडी अन् घर घेतले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता या यादीत ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याची भर पडली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमधून अजिंक्य घराघरात पोहचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर अजिंक्यने मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तो नेहमी सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. अंजिक्यने नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या नवीन कारची झलक दाखवली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, “आनंदी, सोपे आणि समाधानी जीवन. तुमची सगळी स्वप्ने प्रत्यक्षात खरी होवोत आणि ही स्वप्ने पूर्ण होण्याचा आनंद त्याच्या डोळ्यात दिसूदेत, ज्यांनी तुमची प्रगती होत असताना तुम्हाला पाहिले आहे.”
त्याने पुढे लिहिले “यासाठी मी कृतज्ञ व धन्य असून मला याक्षणी माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे. पण मला माहित आहे की ते तिथे खूप आनंदी आहेत आणि त्यांना माझा अभिमानदेखील आहे. तसेच या क्षणासाथी मला माझे गुरू सद्गुरु वेणा भारती महाराज यांचे आशीर्वाद मिळू शकले याचाही मला आनंद आहे.” अजिंक्यची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा- मराठमोळी प्राजक्ता माळी आणि बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा यांची ग्रेटभेट! फोटो शेअर करत म्हणाली…
अजिंक्यच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘विठू माऊली’ या मालिकेत त्याने साकारलेली विठ्ठलाची भूमिका चांगलीच गाजली. सध्या तो ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’मध्ये झळकत आहे. या मालिकेत त्याने राजवीर हे पात्र साकारले आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.