छोट्या पडद्यावर वादग्रस्त शो पैकी एक अशी ओळख असलेला बिग बॉस हा सध्या चांगला चर्चेत आहे. बिग बॉस हिंदी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच तो वादात सापडला आहे. यामागचे कारण म्हणजे यातील दिग्दर्शक आणि निर्माता साजिद खान. ‘हाऊसफुल’ आणि ‘हे बेबी’ यांसारख्या हिट विनोदी चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून साजिद खानला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी त्याने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. साजिदला बिग बॉसमध्ये पाहताच अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्यातच आता सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने पुन्हा बॉलिवूडमध्ये कधीच काम करणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
शनिवारी १ ऑक्टोबरला सलमान खान होस्ट करत असलेला रिअलिटी शो ‘बिग बॉस १६’ ची घोषणा झाली. या पर्वात साजिद खानने स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. मी टू मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींकडून साजिद खानवर गंभीर आरोप झाले आहेत. मी टू चे आरोप असलेल्याला स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये संधी कशी दिली, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. साजिद खानवर मी टू मोहिमेतंर्गत आरोप करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मंदाना करिमी.
आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला
साजिद खानला बिग बॉसमध्ये बघितल्यानंतर मंदानाने सिनेसृष्टीत पुन्हा कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी हमशकल या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. त्यावेळी मला साजिदने कपडे काढण्यासाठी सांगितले होते. मी जे पाहीन ते जर मला आवडलं तर तुला चित्रपटात भूमिका मिळेल, असे त्याने त्यावेळी मला सांगितलं होतं. त्यानंतर आता बिग बॉसमुळे त्याला पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये बघून मला फार मोठा धक्का बसला.”
आणखी वाचा : “मला पक्की खात्री आहे की श्रेया बुगडे…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“फार प्रामाणिकपणे सांगायचे झालं तर त्याला स्पॉटलाइटमध्ये बघून मला आश्चर्य वाटलं नाही. पण एखाद्या गोष्टीतून आपल्याला फायदा मिळत असेल, त्यातून पैसे मिळत असतील तर कोण कशाला पर्वा करेल, असे अनेकांना वाटते. त्यामुळे भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये मी टू मोहिमेनंतर पुढे काहीच होऊ शकलं नाही.”
“पण साजिदला बिग बॉसमध्ये पाहून मला फार वाईट वाटलं. याच कारणामुळे मी गेल्या काही महिन्यांपासून काम करत नाही आणि यापुढे पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणारही नाही. कोणत्याच ऑडिशनसाठी जाणार नाही. कारण जिथे महिलांना आदर दिला जात नाही, अशा बॉलिवूडमध्ये मला परत जायचं नाही. त्या ठिकाणी मला काम देखील करायचं नाही”, असे मंदाना करिमीने म्हटले.