Mandar Jadhav : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेचं नाव आहे ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’. या मालिकेतून स्टार प्रवाहचीच लोकप्रिय झालेली जयदीप-गौरी ही जोडी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव हे कलाकार प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहेत. त्यामुळे या दोघांचे अनेक चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेसाठी मालिकेची टीम कोकणात दाखल झाली आहे.

“‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेसाठी वजन कमी केलं”

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील जयदीप-गौरी या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं आणि तेच प्रेम पुन्हा अनुभवण्यासाठी ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गिरिजा-मंदार हे जुने कलाकार नव्याने मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असले तरी या आधीच्या आणि आताच्या मालिकेत आणि या मालिकांच्या पात्रांमध्ये फरक असल्याचे मंदारने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. स्टार मीडिया मराठीला दिलेल्या मुलाखतीत मंदारने त्याच्या नवीन भूमिकेसाठी वजन कमी केल्याचं सांगितलं.

“‘कोण होतीस तू, काय झालीस तू’मधील भूमिकेसाठी मनापासून प्रयत्न केले”

याबद्दल मंदार असं म्हणाला की, “‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतील यश हा २५ वर्षांचा मुलगा आहे. आजकाल म्हणतो आपण की, Gen-Z मुलगा आहे. माझ्या डोक्यात मी यश या भूमिकेचा विचार केला असता मला कळलं की, हा थोडा तरुण मुलगा आहे. त्यामुळे लोकांना आणि आपल्या नवीन पिढीच्या प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की, मी खरंच २५ वर्षांचा आहे. त्यामुळे मी या भूमिकेसाठी मनापासून प्रयत्न केले आहेत. माझ्याकडे दोन-तीन महिन्यांचा वेळ होता, त्यात मी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला.”

“‘कोण होतीस तू, काय झालीस तू’मधील भूमिकेसाठी दिसण्यावरही केलं काम”

यापुढे मंदारने असं म्हटलं की, “मला वाटतं त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी दिसत आहे. ही फक्त सुरुवात आहे. या भूमिकेसाठी मी माझ्या दिसण्यावरही काम करत आहे; जेणेकरून तो आणखी तरुण दिसेल. यशचं वागणं-बोलणं पूर्णपणे वेगळं होतं. त्या तुलनेत जयदीप खूपच वेगळा होता, जयदीप थोडा रागीट होता आणि पटकन प्रतिसाद द्यायचा. यश तसा नाही. त्याला राग आला तरी तो खूप शांत असतो.”

कोण होतीस तू, काय झालीस तू’ २८ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत गिरिजा आणि मंदार यांच्यासह वैभव मांगले, सुकन्या मोने, अमित खेडेकर, अमृता माळवदकर आणि साक्षी गांधी ही कलाकार मंडळीही पाहायला मिळणार आहेत. येत्या २८ एप्रिलपासून ही नवीन मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. त्यामुळे गौरी-जयदीपला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.