मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी आपल्या आयुष्यात पुढे जाताना दितस आहेत. काहीजण गाडी, तर काहीजण स्वत:चं नवीन घर खरेदी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा बागवे, स्मिता शेवाळे सारख्या कलाकारांनी स्वत:चं हक्काचं घर घेतलं. या कलाकारांमध्ये आता अभिनेता ऋतुराज फडकेच्या नावाचाही समावेश झाला आहे. नुकतंच ऋतुराजने नवीन घर खरेदी केलं आहे.
ऋतुराजने नुकतंच त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋतुराजबरोबर त्याची पत्नी प्रिती दिसत आहे. दोघांच्या हातात नवीन घराच्या चाव्या आहेत. प्रितीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रितीने पोस्टमध्ये लिहिलं, स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलंच एक स्वप्न म्हणजे “आपलं स्वतःचं हक्काचं घर.” ते कसंही असो, लहान किंवा मोठं, पण ते आपलं स्वतःचं असावं. जानेवारी २०२३ मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात busy झालो, त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहागरला जाऊन व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही. अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि ओटी भरून आलो. त्यांचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली.”
प्रिती पुढे म्हणाली, “काही दिवसांपूर्वी आमचं, आपलं स्वतःचं घर” हे स्वप्न पूर्ण झालं आणि आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतोय. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव “योगेश्वरी.” ते म्हणतात ना, “अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है…” हे आम्ही अनुभवलं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्यावर कायम असूद्या. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!”
झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेतून ऋतुराज फडके घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याने कार्तिक ही भूमिका साकारली होती. अनेक नाटकांत व मालिकेत काम केलेल्या ऋतुराजला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २७ जानेवारीला ऋतुराजने प्रितीबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.