Laughter Chefs Season 2: हिंदी टेलिव्हिजनवर सध्या ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच गाजत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीतही ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ अव्वल स्थानावर आहे. प्रेक्षकांचा मिळणारा चांगला प्रतिसाद पाहताच निर्मात्यांनी शो पुढे वाढवला आहे. पण, मनारा चोप्राने ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ला रामराम केला आहे.

‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये काही कलाकार सोडले तर बरेच नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. रुबीना दिलैक, एल्विश यादव, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अब्दु रोजिक हे सहा जण ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये झळकले. ‘लाफ्टर शेफ्स’च्या पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. काही दिवसांपूर्वी अब्दू रोजिकची या लोकप्रिय शोमधून एक्झिट झाली. त्यानंतर आता मनारा चोप्राने देखील शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ १ एप्रिलनंतर पुढे वाढवल्यामुळे मनाराने कॉन्ट्रॅक्टनुसार शोमधून एक्झिट घेण्याचं ठरवलं आहे.

याबाबत मनारा चोप्रा म्हणाली, “असा निर्णय घेणं कधी सोपं नसतं. विशेषतः जेव्हा तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही एक कुटुंब सोडून जात आहात. पण माझ्या कॉन्ट्रॅक्टनुसार मला आता ‘लाफ्टर शेफ्स’च्या कुटुंबाला निरोप देण्याची वेळ आली आहे. विविध पदार्थ बनवता आणि हसवताना हा शो कधी मला कामाचा भाग असल्यासारखं वाटलं आहे. मला हा शो घरासारखा वाटला. ‘लाफ्टर शेफ्स’मधील आठवणी मी कायम जपून ठेवीन. दिग्गज विनोदवीर सुदेश लेहरी यांच्याबरोबर काम करणं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला नवीन ओळख दिल्याबद्दल ‘कलर्स’चे मी खूप आभारी आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये असताना चहा बनवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास खूप भारी होता. ‘लाफ्टर शेफ्स’मुळे मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली.”

दरम्यान, ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ मध्ये अब्दू रोजिकच्या जागी करण कुंद्राची काही दिवसांमध्ये एन्ट्री झाली. त्यामुळे आता मनारा चोप्राच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार? सुदेश लहरी यांची जुनी जोडीदार निया शर्मालाच पुन्हा निर्माते घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला मनाराने ‘खतरों के खिलाडी सीझन १५’ साठी ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ सोडल्याचं म्हटलं जात आहे.