महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘होम मिनिस्टर’ला ओळखले जाते. गेल्या १९ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’चा हा प्रवास आता २०व्या वर्षात पदार्पण करत आहे. नुकतंच अभिनेते आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली, याबद्दल भाष्य केले.
आदेश बांदेकर यांनी नुकतंच मुंबई तक या वृ्त्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना हा कार्यक्रम फक्त १३ दिवसांसाठी सुरु होणार होता, असे म्हटले जातं, याबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी हो हे अगदी खरं आहे, असे म्हटले. त्याबरोबरच त्यांनी याचा पहिला भाग कसा चित्रीत झाला त्याची आठवण सांगितली.
आणखी वाचा : “मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा
आदेश बांदेकर काय म्हणाले?
“झी मराठी वाहिनीवर एक मालिका बंद झाली होती आणि दुसरी मालिका सुरु होणार होती. यादरम्यानच्या वेळात दोन आठवड्यांसाठी काहीतरी करावं अशा भावनेतून कार्यक्रम सुरु झाला. याच काळात मी स्ट्रगल करत होतो.
झीच्या अशाच चकचकीत कार्यालयात मी गेलो आणि काही माऊली तिथे बसल्या होत्या. मी त्यांच्याशी काहीतरी बोललो. त्यास सर्वजणी हसल्या. त्या हसलेलं पाहून नितीन वैद्य केबीनमधून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी बांदेकर आत या, असे म्हटले. मी आत गेलो, तिथे गप्पा सुरु झाल्या. आता तू जे काही केलंस, तसं घरी जाऊन कुटुंबाशी गप्पा मारशील का? असं मला त्यांनी विचारलं. मी त्यांना हरकत नाही म्हटले.
मी दोन कॅमेरे घेऊन निघालो. लालबागमधील हाजी कासम बिल्डींग याच बिल्डींगमध्ये प्रोमो शूट करायचं असं आमचं ठरलं. तिथे गेल्यानंतर गाण्याची पहिली ओळ दार उघड वहिनी, दार उघड अशी आहे. पण जेव्हा मी त्या बिल्डींगमध्ये गेलो, तेव्हा पटापट त्या वहिनी दरवाजे बंद करु लागल्या. त्या सर्वसामान्य स्त्रिया होत्या. त्यांना एक प्रश्न विचारल्यावर त्या पळायला लागल्या.
त्यानंतर पहिला एपिसोड २२ मिनिटांसाठी शूट करायचा होता. तो एपिसोड आम्ही शूट केला. तो भाग आम्ही निखिल साने, नितीन वैद्य, अजय बाळवणकर यांना दाखवला. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही हावभाव नव्हते. त्यावेळी नितीन वैद्य यांनी त्या ऑफिसमध्ये काम करणारे, हाऊसकिपिंगची मंडळी अशा लोकांना बोलवलं. त्याच्यासमोर तो भाग परत लावला. तो एपिसोड पाहिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ठरलं की या कार्यक्रमाला कोणत्याही तांत्रिक गोष्टी लागू करायच्या नाहीत. ती गृहिणी रिटेक घेणार नाही, अशा पद्धतीने याचे चित्रीकरण केले जाईल.
फक्त १३ दिवसांसाठी एक मालिका बंद होणार होती, म्हणून हा कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. आता १४ लाखाहून जास्त किलोमीटरचा प्रवास करुन ही आनंदाची यात्रा १९ वर्ष पूर्ण करुन २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. १३ सप्टेंबर २००४ ला याचा पहिला भाग प्रदर्शित झाला”, असे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
दरम्यान ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या १९ वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमाने जवळपास १४ लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास, ६००० भाग आणि १२००० घर इतका मोठा पल्ला गाठला आहे.