‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. ६ ऑक्टोबरला सूरज चव्हाणला विजेता घोषित करताच अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील सूरजबद्दल पोस्ट लिहून कौतुक केलं होतं. पण या पोस्टवरून अभिजीतला ट्रोल करण्यात आलं. त्याच ट्रोलिंगवर आता अभिजीतने भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वी ‘मीडिया टॉक मराठी’ या युट्यूब चॅनेलशी अभिजीत केळकरने संवाद साधला. यावेळी अभिजीत सोशल मीडियाविषयी सांगत असताना त्याने सूरज चव्हाणसंदर्भातील झालेल्या पोस्टवरून ट्रोलविषयी भाष्य केलं. तो म्हणाला, “माझ्या मुलांनी सोशल मीडियावर येऊच नये असं मला वाटतं, हे माझं खूप प्रामाणिक मत आहे. कारण एकंदरीत जे सोशल मीडियावर सध्या सुरू आहे. ती मला न आवडणारी गोष्ट आहे. आता मी अभिनेता आहे, त्यामुळे आपल्या कलाकृतीचं प्रमोशन व्हायला पाहिजे म्हणून सोशल मीडियावर सक्रिय आहे. जर मी अभिनेता नसतो तर मी सोशल मीडियावर नसतो. कारण ज्याप्रकारचं ट्रोलिंग होतं किंवा आपण एखादी पोस्ट टाकल्यानंतर ती कुठल्या थराला जाऊ शकते. म्हणजे आताच एक उदाहरण द्यायचं झालं तर, अलीकडेच जेव्हा ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू होतं. तेव्हा सूरज चव्हाणबद्दल पोस्ट लिहिली होती. त्याचे इतके वेगळे अर्थ काढले. मला त्या मुलाचं कौतुक वाटतं होतं.”
पुढे अभिजीत केळकर म्हणाला, “मी अशी पोस्ट केली होती की, जी आर्थिक आणि सामाजिक समानता, संधी…गेले ७५ वर्ष आपली लोकशाही देऊ शकली नाही, ती सूरजला सोशल मीडिया आणि एका रिअॅलिटी शोने दिली. त्या मुलाबद्दल मला कौतुकचं होतं. पण, मला कसा लोकशाही विषयी आदर नाहीये, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा कसा अनादर करतोय अशा प्रकारे लोकांनी ती गोष्ट पुढे नेली. तरीही मी कोणालाही स्पष्टीकरण देत बसत नाही. कारण मला माहित असतं बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी काय आहेत, मी कुठल्याही जातीचा असलो तरी. त्यामुळे मला त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावंस वाटतं नाहीये.”
“पण, मला दुःख होतं. कारण मी या जातीचा आहे म्हणून मी अनादर करीन किंवा दुस्वास करत असेन, हे तुम्ही मला शिव्या देऊन सांगत असाल तर मला त्याचं दुःख होतं. कारण जेवढे बाबासाहेब तुम्हाला तुमचे वाटतात. तेवढेचं मी ब्राम्हण जातीतला असलो तरी मला पण माझेच वाटतात. कारण त्यांनी दिलेलं संविधान मानून मी चाललो आहे. मी त्याच देशात राहतोय, ज्या देशात सगळ्यात मोठी लोकशाही आहे. माझं म्हणणं त्याबाबतीत एवढंच होतं जी समानता लोकशाहीने सूरजसारख्या गावातल्या मुलाला देणं अपेक्षित होतं ते त्याला मिळालं नाही. तर मला तेवढंच म्हणायचं होतं,” असं अभिजीत केळकरने सांगितलं.
हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”
दरम्यान, अभिजीत केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्याची ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत एन्ट्री झाली. अभिजीतने केतकीचा नवरा केदारची भूमिका साकारली आहे. याआधी अभिजीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत झळकला होता.