मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ शेअर करत या अभिनेत्याने तो लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं आहे. २६ जानेवारीला सकाळी “काहीतरी गुडन्यूज आहे, ओळखा काय असेल?” अशी इन्स्टाग्राम स्टोरी या अभिनेत्याने शेअर केली होती. यानंतर त्याच्या चाहत्यांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आगळावेगळा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने तो बाबा होणार असल्याचं सर्वांना सांगितलं.
‘शुभविवाह’, ‘नवे लक्ष्य’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. अभिजीत आणि त्याची पत्नी सेजल या दोघांनी ही गुडन्यूज एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत आणि सेजल दोघंही शेतात चहा/कॉफी पित, वृत्तपत्र वाचत बसल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजीत वाचत असलेल्या वृत्तपत्रावर ‘द प्रेग्नन्सी पोस्ट’ असं शीर्षक दिलं असून त्या खाली ‘बेबी श्वेतचंद्र Coming Soon’ असं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत आणि सेजल यांनी Twinning केल्याचं दिसतंय. या हटके सिनेमॅटिक व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिजीतने बाबा होणार असल्याचं जाहीर करताच मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत आणि सेजलने २०२३ मध्ये लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता हे दोघंही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
अभिजीत श्वेतचंद्र हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘स्टार प्रवाह’वरील ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’ या मालिकांमधून तो घराघरांत पोहोचला. त्याने ‘बापमाणूस’, ‘सुभेदार’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या तो ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘आई तुळजाभवानी’मधून या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर करत शशांक केतकरने सुद्धा तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. शशांकच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन झालं असून त्याने आपल्या लेकीचं ‘राधा’ असं ठेवलं आहे.