‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘शुभविवाह’. अभिनेता यशोमन आपटे व अभिनेत्री मधुरा देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत रागिणी वेदांगी आणि आकाशचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. भूमी ही आकाशची शक्ती व सुरक्षा कवच असल्यामुळे रागिणीने हा नवा डाव रचला आहे. भूमीला दूर करण्यासाठी ती सतत वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. जर वेदांगी आणि आकाशचं लग्न झालं तर आकाशची संपूर्ण संपत्ती हडपण्याचा डाव रागिणीचा पूर्ण होईल, असं तिला वाटतं आहे. पण आता नेमकं येत्या काळात काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच ‘शुभविवाह’ मालिकेतून अचानक एका अभिनेत्याची एक्झिट झाली आहे.
‘शुभविवाह’ मालिकेत अभिजीत पटवर्धनच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे. मालिकेच्या आजच्या भागात अभिजीतच्या जागी ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता झळकला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
‘शुभविवाह’ मालिकेत ‘लग्नाची बेडी’मध्ये झळकलेला अभिनेता सिद्धेश प्रभाकरची एन्ट्री झाली आहे. सिद्धेश प्रभाकर अभिजीत पटवर्धनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धेश ‘झी मराठी’च्या ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत तो वसुंधराच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. पण आता तो ‘शुभविवाह’ मालिकेत दररोज पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन
दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने अनेक मालिका, चित्रपटात काम केलं आहे. तसंच मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच अभिजीत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात झळकणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून २ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.