‘शुभविवाह’, ‘नवे लक्ष्य’, ‘आई तुळजाभवानी’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या मराठी अभिनेत्याने साधारण महिन्याभरापूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ शेअर करत या अभिनेत्याने तो लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता या अभिनेत्याच्या पत्नीचं नुकतंच डोहाळेजेवण पार पडलं आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने इन्स्टाग्राम शेअर केला आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे पाहूयात…

मराठी मालिका तसेच चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीत आणि त्याची पत्नी सेजल या दोघांनी ही गुडन्यूज एक हटके व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘बेबी श्वेतचंद्र Coming Soon’ असं लिहिलं होतं. आता नुकतंच सेजलचं डोहाळेजेवण पार पडलं आहे.

सेजल डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी हिरवी साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घालून तयार झाली होती. अभिनेत्याने ‘कुणीतरी येणार येणार गं’ असं कॅप्शन देत पत्नीच्या डोहाळेजेवणाची झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत आणि सेजलने २०२३ मध्ये लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता हे दोघंही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. लग्नानंतर दोन वर्षांनी अभिजीत आणि सेजल आपल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

अभिजीत श्वेतचंद्रने शेअर केला पत्नीच्या डोहाळेजेवणाचा व्हिडीओ

दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रच्या ( abhijeet shwetchandra ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘आई तुळजाभवानी’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमात अभिजीत हा प्रभू विठ्ठलाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.