मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ शेअर करत लवकरच बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अभिनेत्याने आपल्या पत्नीचं घरच्या घरी डोहाळेजेवण केलं होतं. आता नुकतंच त्याच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे.
‘शुभविवाह’, ‘नवे लक्ष्य’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी लग्नानंतर दोन वर्षांनी पाळणा हलला आहे. अभिजीत श्वेतचंद्रला मुलगा झाला आहे. अभिनेत्याने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. याशिवाय अभिनेत्याने बाळाचं नाव काय ठेवायचं यासाठी चाहत्यांकडे खास मदत मागितली आहे.
अभिजीत श्वेतचंद्र ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान संवाद साधताना अभिनेत्याने मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली. अभिजीत श्वेतचंद्र म्हणाला, “मी असा विचार करतोय की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेव या दोघांच्या नावाचा संगम होईल असं नाव मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांना सुद्धा काही सुचत असेल तर मला नक्की सांग. मी शिवभक्त असल्याने त्यांच्या संबंधित बाळाचं नाव मला ठेवायचं आहे.”
अभिजीत श्वेतचंद्र आणि त्याची पत्नी सेजलने २०२३ मध्ये लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता लग्नानंतर दोन वर्षांनी अभिजीत आणि सेजल यांनी आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सेजलच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी अभिनेत्याची पत्नी सुंदर अशी हिरवी साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घालून तयार झाली होती.
दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रच्या ( Abhijeet shwetchandra ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘आई तुळजाभवानी’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याने ‘बापमाणूस’, ‘सुभेदार’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. याशिवाय आता लवकरच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमातून अभिजीत हा प्रभू विठ्ठलाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा सिनेमा १८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.