‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’मध्ये अजिंक्यच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमित खेडेकरच्या आईचं दुःख निधन झालं आहे. वयाच्या ६०व्या वर्षी अमितच्या आईनं अखेर श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पण त्यांची ही झुंज १५ मे रोजी अपयशी झाली. यासंदर्भात अमित खेडेकरने स्वतः भावुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
अभिनेता अमित खेडेकरने आईचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की माझी आई, सौ. सुनिता खेडेकर, १५ मे रोजी, रात्री १२.५०च्या सुमारास वयाच्या ६०व्या वर्षी या जगातून कायमची निघून गेली आहे. ती गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती.”
हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेनं ४०० भागांचा टप्पा केला पार, कलाकारांनी ‘असं’ केलं सेलिब्रेशन
पुढे अमितने लिहिलं, “ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंबीय दुःखाच्या छायेत आहेत. तिच्या जवळच्या लोकांन पलीकडे ही, माझ्या आईचा प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक समुदायावर पसरला आहे. ती नेहमी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी, दुःखात गरजूंना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या निःस्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक अमिट छाप सोडली.”
हेही वाचा – Video: ऑनस्क्रीन मायलेक ऐश्वर्या नारकर व अजिंक्य ननावरे यांनी एकमेकांचं काढलं चित्र, पाहा व्हिडीओ
“खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. या कठीण काळात आमच्या बरोबर असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. खेडेकर कुटुंबीय…” असं अमितने लिहिलं आहे.
अमितच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता देशमुख, मंजिरी ओक, शुभंकर एकबोटे अशा बऱ्याच कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. “भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो”, “अमित त्या नसूनही आठवणीच्या रुपात, त्यांनी तुमच्यावर केलेल्या संस्कारांच्या रुपात तुमच्याबरोबरच आहेत”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी अमितच्या पोस्टवर केल्या आहेत.